गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा सोमवारी मध्यरात्री शपथविधी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले आहे. विधानसभेत सकाळी ११.३० वाजता ही शक्तिपरीक्षा होणार आहे. गोव्यात भाजपचे संख्याबळ १२ असून, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांबरोबरच तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे.