नव्या मोटार वाहतूक कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. या नव्या कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करुन अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आल्यानंतर हे नवे नियम लागू झाले आहेत. असे असतानाच आता या नवीन नियमांप्रमाणे होणाऱ्या दंडासंदर्भातील अनेक बातम्या समोर येत आहेत. त्याचवेळी पोलिसांकडून होणाऱ्या दंडवसुलीसंदर्भातील काही व्हिडिओही समोर आले आहेत. वाहतूकीचे नियम कठोर केले असले तरी वाहन चालकांनाही काही अधिकार कायद्याने दिले आहेत. अनेकदा चुकीच्या पद्धतीने दंडवसुली करणाऱ्या पोलिसांचे चित्रकरण करता पोलीस मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोलिसांनी असा प्रयत्न करणे चुकीचे असून वाहन चालकावर कारवाई होत असल्यास तो चालक मोबाइल कॅमेरावरुन त्या कारवाईचे चित्रण करु शकतो. पोलिसांना तो मोबाइल खेचून घेण्याचा कोणताच अधिकार पोलिसांकडे नसल्याचे हरियाणा पोलिसांनी एका महिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

फरीदाबाद येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अनुभव सुखीज यांनी वाहन चालकांना काय अधिकार आहेत यासंदर्भात हरियाणा पोलिसांकडून माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. या अर्जाला उत्तर देताना एखाद्या चालकाकडे वाहन परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर चालक मोबाइलमधून त्या कागदपत्रांचे फोटो पोलिसांना दाखवू शकतो असं पोलीस खात्याने स्पष्ट केलं आहे. गाडीमध्ये हॉकीस्टीक, क्रिकेट बॅट, स्टॅप यासारखे सामान ठेवण्यावर कोणत्याच प्रकारची बंदी नसून बेकायदेशीर हत्यार गाडी सापडले तरच कारवाई केली जाते असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

चारचाकी चालवताना चालकाबरोबरच त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला सीटबेल्ट लावणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी या अर्जाला उत्तर देताना सांगितले आहे. मात्र चालकाच्या बाजूला बसलेली महिला गर्भवती असेल किंवा जखमी असेल तर मानवतेच्या दृष्टीकोनातून तिला सीटबेल्ट न घालण्याची मूभा देण्यात येते असं पोलिसांनी म्हटलं आहे.

एखादी व्यक्त काही कामासाठी पोलीस स्थानकामध्ये गेल्यास ती व्यक्तील आपले वाहन पोलीस स्थानकाच्या हद्दीत उभे करु शकते. गाड्यांवर डॉक्टर, वकील आणि पत्रकार असल्याचे स्टीकर लावण्यासंदर्भात कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नसल्याचे पोलिसांनी या अर्जाला उत्तर देताना म्हटले आहे. मात्र एखादी व्यक्ती आपल्या खासगी वाहनावर भारत सरकार किंवा राज्य सरकारचा स्टीकर लावत असेल तर मोटर वाहन कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना असल्याचे उत्तरामधून नमूद करण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी हात दाखवून वाहन थांबवू शकता. वाहनाची तपासणी करु शकतात. पोलिसांनी थांबायला सांगूनही एखादा वाहन चालक थांबला नाही तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र कोणताही पोलीस कर्मचारी वाहन चालकाला शिवीगाळ किंवा मारहाण करु शकत नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

एखादा वाहन चालक आपल्या खासगी वाहनामधून व्यापाराच्या उद्देशाने काही सामान घेऊन जात असेल तर पोलिसांना या सामानाचे बील तपासण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी या सामानासंदर्भातील कागदपत्रांची विचारपूस केल्यास ते पोलिसांसमोर सादर करणे ही वाहनचालकाची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.