ट्विटरचे सहसंस्थापक आणि मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी (Twitter CEO) जॅक डोर्से यांनी (Jack Dorsey) सीईओ पदाचा राजीनामा देताना यामागील प्रमुख ३ कारणं सांगितली आहेत. यात त्यांनी कंपनीच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या १६ वर्षांचे आपले अनुभव आणि नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्यापासून संचालक मंडळाचे नवे प्रमुख, कंपनीची टीम याबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

जॅक डोर्से म्हणाले, “जवळपास १६ वर्षे कंपनीत सहसंस्थापक ते सीईओ अशा विविध पदांवर काम केल्यानंतर आता मी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. कंपनीच्या संस्थापकांनीच कंपनीचं नेतृत्व करण्याच्या महत्त्वाविषयी खूप चर्चा आहे. पण मला वाटतं यामुळे काही मर्यादा येतात. मी या कंपनीला तिच्या संस्थापकांपासून दूर नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलाय. यामागे प्रमुख ३ कारणं आहेत.”

“पहिला कारण परागची सीईओ पदावर नियुक्ती”

“पहिला कारण परागची सीईओ पदावर नियुक्ती होते आहे हे आहे. संचालक मंडळाने सर्व पर्यायांचा विचार करून एकमताने परागच्या नावावर शिक्कामोर्तब केला. तो माझीही निवड होता. त्याला कंपनीची आणि कंपनीच्या गरजांची खूप खोलवर समज आहे. ट्विटरच्या वाढीमागील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे पराग होता. पराग जिज्ञासू, संशोधक, तार्किक, सृजनशील, नवं मागणारा, स्वतःबद्दल सतर्क असणारा आणि विनम्र आहे. तो त्याच्या ह्रदय आणि आत्म्यातून नेतृत्व करेन. तो असा व्यक्ती आहे ज्याच्याकडून मी दररोज शिकतो. मला आपल्या कंपनीचा सीईओ म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

“दुसरं कारण ब्रेट टेलर यांनी संचालक मंडळाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणे”

जॅक आपल्या राजीनाम्यामागील दुसरं कारण नमूद करत म्हणाला, “दुसरं कारण ब्रेट टेलर यांनी संचालकमंडळाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दिली. मी सीईओ झालो तेव्हा मी ब्रेटला संचालक मंडळात येण्याची विनंती केली होती. तो प्रत्येक दृष्टीने सर्वोत्तम आहे. तो स्वतः इंजिनियर असून उद्योन्मुखता, धोका पत्करणं, तंत्रज्ञान, कंपनीचा विस्तार याची त्याला खूप चांगली समज आहे. सध्या संचालक मंडळाला आणि कंपनीला हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्याच्यात आहेत. ब्रेट नेतृत्व करत असल्यानं मला संचालक मंडळाच्या शक्तीवरील आत्मविश्वास वाढलाय. यामुळे मला किती आनंद झालाय याची तुम्हाला कल्पना करता येणार नाही.”

“राजीनाम्यामागील तिसरं कारण ट्विटरची संपूर्ण टीम”

“राजीनाम्यामागील तिसरं कारण तुम्ही सर्वजण आहात. आपल्या कंपनीच्या या टीममध्ये खूप महत्त्वकांक्षा आणि ताकद आहे. हेच पाहा ना परागनं इथं इंजिनियर म्हणून सुरुवात केली आणि आज तो सीईओ झालाय. मी देखील असाच प्रवास केलाय, पण परागने माझ्यापेक्षा चांगला प्रवास केला. याचा मला खूप अभिमान वाटतो. टीममधील या सर्व उर्जेचा पराग खूप चांगला वापर करू शकेल. कारण तो ते जगलाय आणि त्यासाठी काय करावं लागतं हे त्याला माहिती आहे. तुम्हा सर्वांमध्ये कंपनीचा चांगल्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याची शक्ती आहे. मला मनापासून असं वाटतं.”