दुबई : अबू धाबी येथे सोमवारी संभाव्य ड्रोन हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटाचा फटका तीन तेल टँकरना बसला, तसेच अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित इमारतीत आग लागली. यात तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले.

मृतांपैकी दोन भारतीय व एक पाकिस्तानी असल्याचे पोलिसांनी सांगितले. किरकोळ जखमी झालेल्या सहा जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

या हल्ल्यामागे कुणाचा हात होता याबाबत अबू धाबी पोलिसांनी लगेच काही सांगितले नसले, तरी येमेनमधील हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातींना लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र त्यांनी याबाबत तपशील दिले नाहीत.

इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बडखोरांनी यापूर्वी अनेक हल्ल्यांचा दावा केला आहे, मात्र अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी नंतर असे हल्ले झाल्याचे अमान्य केले आहे.

येमेनमध्ये अनेक वर्षे सुरू असलेल्या युद्धाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना, तसेच अमिरातीचा झेंडा असलेले एक जहाज हुथींनी अलीकडेच ताब्यात घेतले असताना ही घटना घडली आहे.

संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) येमेनच्या संघर्षग्रस्त भागातून आपल्या राष्ट्रीय फौजा मोठय़ा प्रमाणात मागे घेतल्यामुळे अरब जगतातील या सर्वात गरीब देशाची परिस्थिती वाईट झाली आहे.

प्राथमिक तपासातील निष्कर्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाव्यत: ड्रोनचा भाग असलेल्या लहान उडत्या वस्तू दोन भागांत पडल्याचे आढळले असून, त्यामुळेच स्फोट होऊन आग लागली असावी, असे प्राथमिक तपासात दिसून आल्याचे अबू धाबी पोलिसांनी सांगितले. या घटनांमध्ये फारसे नुकसान न झाल्याचेही ते म्हणाले. या आगीचे कारण शोधण्यासाठी आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यापक तपास सुरू केला आहे.