पाकिस्तानविरोधात २०१६ आधी झालेल्या लक्ष्यभेदी कारवायांचा कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचे लष्कराने मंगळवारी जाहीर केले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकिर्दीत पाकिस्तानविरोधात किती लक्ष्यभेदी कारवाया झाल्या त्याचा तपशील जम्मू येथील कार्यकर्ते रोहित चौधरी यांनी माहिती अधिकारात विचारला होता.  २००४ ते २०१४ या कालावधीत तसेच सप्टेंबर २०१४नंतर किती लक्ष्यभेदी कारवाया झाल्या आणि त्यातील किती यशस्वी ठरल्या त्याचा तपशील प्रश्नकर्त्यांने विचारला होता.

त्याच्या उत्तरात लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी कळवले की, ‘‘२९ सप्टेंबर २०१६पूर्वी लक्ष्यभेदी कारवाया झाल्या असतील, तरी त्यांचा कोणताही तपशील आमच्याकडे नाही.’’

आमच्या कारकिर्दीतही लष्कराने अनेक लक्ष्यभेदी कारवाया पार पाडल्या. पण जवानांच्या शौर्याचा राजकीय लाभ घेण्याचा विचारही आमच्या मनाला शिवला नव्हता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गेल्याच आठवडय़ात एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. भाजपने मात्र काँग्रेसचे दावे खोटे असल्याचा आरोप केला होता.