व्हॉट्स अॅपवरील फोटोमधून पोलिसांनी मिळवले बोटांचे ठसे, ड्रग डीलर गजाआड

व्हॉट्स अॅपच्या इमेजवरून फिंगर प्रिंट मिळवून जर आरोपीला अटक करता येत असेल तर सोशल मीडियाची बरी वाईट ताकद आपण ओळखायला हवी

प्रातिनिधिक छायाचित्र

एका ड्रग डीलरला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क व्हॉट्स अॅपच्या फोटोमधून त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे मिळवले आणि त्या आधारे त्याला अटक केली. इंग्लंडमध्ये ही घटना खरोखर घडली असून गुन्हेगार पकडण्यासाठी व्हॉट्स अॅप इमेजचा या पद्धतीचा वापर करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

ड्रग डीलरच्या हातात एक गोळ्यांची बाटली असल्याचा हा फोटो होता. ड्रग डीलरच्या ग्राहकाला एका छाप्यात पकडल्यानंतर पोलिसांना त्याच्या आयफोनमध्ये हा फोटो मिळाला. त्यात त्याच्या हाताचा तळवा नीट दिसत होता. हा फोटो मग पोलिसांच्या फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. पोलिसांच्या इमेज डेटाबेसमध्ये या फोटोची ओळख पटेना कारण दोन बोटं सोडली तर बाकी काही दिसत नव्हतं. मग त्या फिंगरप्रिंट्स व अन्य काही माहिती या आधारे त्यांनी संशयिताचं नाव निश्चित केलं. त्यावरून मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी फोटोतल्या बोटांचे ठसे, त्याचे ठसे व अन्य बोटांचे ठसे असा सगळा मेळ जुळवला व हीच व्यक्ती ड्रग डीलर असल्याची त्यांची खात्री पटली.

बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार फोटो जरी स्पष्ट नसला किंवा अन्य काही पुरावा नसला तरी दोन बोटांचे फिंगर प्रिंट पुढचा माग काढायला पुढे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याच मार्गाने अन्य गुन्हेगारी प्रकरणे हाताळता येतील हा धडा पोलिसांना मिळाला आहे असे साउथ वेल्स पोलिसांच्या सायंटिफिक सपोर्ट युनिटच्या डेव्ह थॉमस यांनी म्हटले आहे. कुठल्याही गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये फोटोमध्ये हात दिसत असेल तर तो लगेच आमच्याकडे पाठवण्यात येत असून अशा फोटोंचा पूर आला असल्याचे थॉमस म्हणाले आहेत.

अर्थात, हे डिटेक्टिव स्टोरीला साजेसं असून व्हॉट्स अॅपच्या इमेजवरून फिंगर प्रिंट मिळवून जर आरोपीला अटक करता येत असेल तर सोशल मीडियाची बरी वाईट ताकद आपण ओळखायला हवी अशी सूचक प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Whats app image gave finger prints of accused drug dealer