Chennai Air Show: भारतीय हवाई दलाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शो दरम्यान डिहायड्रेशनमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तब्बल २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कार्तिकेयन (३४) या तरुणाचाही मृत्यू झाला. कार्तिकेयन कुटुंबासह एअर शो पाहायला गेला होता. कार्तिकेयनची पत्नी शिवरंजनीने या घटनेची माहिती देताना त्यादिवशी काय झाले? हे सांगितले. शो संपताच लाखो लोक बाहेर पडण्याच्या ठिकाणी जमा झाले. कार्तिकेयनने पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाला एका बस स्टॉपवर थांबायला सांगितले आणि तो काही त्याची दुचाकी जिथे पार्क केली होती, ती आणायला गेला. मात्र दुर्दैवाने तो परतलाच नाही.

तिरुवोत्रियूर येथे राहणाका कार्तिकेयन एका खासगी कंपनीत काम करत होता. मरीना समुद्रकिनारी आयोजित केलेला शो पाहण्यासाठी तोही लाखो नागरीकांप्रमाणे तिथे गेला होता. या ‘शो’ला सर्वाधिक लोक उपस्थित राहिल्यामुळे याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्मध्ये नोंद करण्यात आली. मात्र या कार्यक्रमासाठी गर्दीचे नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले. शहरातील विविध भागात गर्दी झाल्यामुळे लाखो लोक फसले होते. मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे आणि गर्दीत पाणी न मिळाल्यामुळे लोकांना त्रास व्हायला लागला आणि काहींची प्रकृती बिघडली.

हे वाचा >> पिंपरी- चिंचवड: रोड रोमिओने त्रास दिल्याने १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना…

कार्तिकेयकनची दुचाकी काही किलोमीटर दूर पार्क केलेली होती. दुचाकी आणण्यासाठी त्याला खूप गर्दीतून जावे लागले. मरीना समुद्रकिनारी सेंट जॉर्ज किल्ल्याजवळ असलेल्या नॅपियर पुलाजवळ त्याने दुचाकी उभी केली होती. “तो जेव्हा दुचाकी आणायला गेला, ते्व्हा अनेक तास आम्ही त्याला फोन करत होतो. पण त्यावेळी अनेकांचे फोन लागत नव्हते. मी लागोपाठ कार्तिकेयनला फोन करत होते. दुपारी ३.१५ वाजता कुणीतरी त्याचा फोन उचलला. समोरच्या व्यक्तीने सांगितले की, कार्तिकेयन अचानक कोसळला असून त्याठिकाणी आम्हाला बोलाविण्यात आले”, असे कार्तिकेयनच्या पत्नीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही तात्काळ सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. तेव्हा कार्तिकेयन जमिनीवर पडलेला होता. आम्ही रुग्णवाहिका बोलवून त्याला रुग्णालयात नेले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मला माहीत नाही, त्या दोन तासात त्याच्याबरोबर काय झाले. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?”, असा प्रश्न शिवरंजनीने उपस्थित केला. शिवरंजनीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, जोपर्यंत कार्तिकेयनच्या मृत्यूचे कारण समजत नाही, तोपर्यंत तिने मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला. तथापि, रुग्णालयाने कार्तिकेयनच्या चुलत भावाची स्वाक्षरी घेऊन त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून दिला.