भारताचे मत

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात तातडीने सुधारणा कार्यक्रम राबवण्याची गरज आहे, असे भारताने म्हटले असून या संस्थेच्या कारभारात अनेक त्रुटी असल्याने त्याचा फटका ६ कोटी लोकांना बसत आहे, अशी टीकाही केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्याने युद्ध व संघर्षांच्या मार्गाने आर्थिक व मानवी पातळीवर त्याची किंमत मोजावी लागत आहे, असे सांगण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे स्थायी राजदूत अशोक मुखर्जी यांनी सांगितले, की सुरक्षा मंडळाचे कामकाज नीट होत नसल्याने किंबहुना त्यात अनेक त्रुटी असल्याने त्याचा फटका ६ कोटी लोकांना बसला आहे. समान प्रतिनिधित्व व सुरक्षा मंडळ सदस्यत्वातील वाढीचा प्रश्न या विषयावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले, की सुरक्षा मंडळ सुधारणांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रयत्न होताना स्पष्टपणे दिसत नाहीत, २०३० पर्यंत दारिद्रय़ाला हद्दपार करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे पण जर आपण सुरक्षा मंडळातील सुधारणांना वाव दिला नाही, तर या दारिद्रय़ निर्मूलन कार्यक्रमासही फटका बसणार आहे, विकसनशील देशांवर त्याचा परिणाम होईल. आमसभेचे अध्यक्ष मॉगेन्स लिकेटॉफ्ट यांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते.