आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल” असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. “उत्तर प्रदेश सरकार स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित आहे. गुलामीच्या मानसिकतेचं प्रतीक चिन्हं सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.” असंही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. मात्र

मुघलांची सत्ता भारतामध्ये जवळजवळ सव्वा तिनशे वर्ष होती. १५२६ ते १८५७ दरम्यान मुघलांनी भारतावर राज्य केलं. या कालावधीमध्ये भारतातील सर्वच क्षेत्रांवर मुघल संस्कृतीचा प्रभाव पडला. ऐतिहासिक वास्तूंबरोबरच देशभरातील अनेक पर्यटनस्थळं, गावं आणि शहरांना आजही मुघलांनी दिलेली नावं आहेत. देशातील सहा लाख शहरं आणि गावांपैकी ७००हून अधिक अगदी ठोसपणे सांगायचं तर ७०४ जागांना मुघल सम्राज्यातील पहिल्या सहा राजांची नावं देण्यात आली आहे. यामध्ये बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या राजांचा समावेश होतो.
१५५६ मध्ये अकबराचा राज्याभिष्येक होऊन तो गादीवर बसला तेव्हापासून ते अगदी १७०७ मध्ये औरंगजेबचा मृत्यू होईपर्यंत मुघलांची भारतावर मजबूत पकड होती. मुघल सम्राज्याचा भारतातील पाया बाबरने रचला. बाबरने १५२६ साली दिल्लीचा सुल्तान इब्राहिम लोढी याला पनिपतच्या पहिल्या युद्धामध्ये हरवलं. त्यानंतर चार वर्ष बाबरने राज्य केलं. बाबरचा मुलगा हुमायून याच्या हाती आलेली सत्ता त्याला नीट राखता आली नाही. त्यामुळेच उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भागावर अफगाण सुरी घराण्याने ताब्यात घेतला. १५४० साली शेर शाह सुरीने हुमायूनला कनौजमध्ये झालेल्या लढाईमध्ये हरवलं.

मुघल शासकांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध झालेला राजा म्हणजे अकबर. आज भारतामध्ये अकबराच्या नावाने २५१ गावे आणि शहरे आहेत. त्या खालोखाल औरंगजेबच्या नावावर १७७, जहांगीरच्या नावार १४१, शहाजहाँनच्या नावावर ६३ तर बाबरच्या नावावर ६१ शहरांना किंवा गावांना नावं देण्यात आली आहेत. सर्वात कमी म्हणजे हुमायूनच्या नावावर देशात ११ शहरे किंवा गावं आहेत.

मुघल शासकांची नावं देण्यात आलेल्या बहुतांश जागा या उत्तर किंवा मध्य भारतामध्ये आहेत. याच भागामध्ये मुघल सम्राज्याच्या राजधान्या होत्या त्यामुळेच येथे या नावांचा प्रभाव अधिक जाणवतो. राज्यांच्या दृष्टीने विचार केल्यास उत्तर प्रदेशमधील एक लाखांहून अधिक गावांपैकी ३९६ गावांना मुघल प्रशासकांचे नाव देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश खालोखाल बिहारमधील ९७, महाराष्ट्रातील ५० तर हरयाणामधील ३९ शहर अथवा गावांना मुघल प्रशासकांची नावं आहेत.

मुघल प्रशासकांच्या नावाने नामकरण करण्यात आलेल्या अनेक लहान मोठ्या खेड्यांची नाव ही अकबरापूर, औरंगाबाद, हुमायूनपूर, बाबरपूर अशी आहेत. तर हिंदी आणि मुघल प्रशासकांची एकत्र नावंही अनेक ठिकाणी वापरण्यात आली आहेत. उदारहणार्थ : निवास खांद्रीका, दामोदरपूर शहाजहाँन.

यापैकी ७० गावं किंवा शहरांची नावं अकबरापूर असं आहे. या खालोखाल औरंगाबादचा क्रमांक लागतो. देशामध्ये ६३ शहर किंवा गावांची नावं औरंगाबाद आहेत. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे.

२०१७ साली सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अनेक जागांची नावं बदलली आहेत. यामध्ये मुगलसराई रेल्वे स्थानकाचे नाव पंडीत दिनदयाल उपाध्याय नगर असं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अलाहबादचे नाव प्रयागराज, फैजाबादचे नाव अयोध्या करण्यात आलं आहे. इस्लामिक सत्तेआधी या शहरांची जी नावं होती ती त्यांना देण्यात यावी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागणीनुसार हे नामकरण केलं जात आहे.

आग्र्यामधील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का?

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आग्र्यातील संग्रहालयाला देण्यामागील संबंध सांगायचा झाल्यास औरंबजेबच्या तावडीतून महाराजांनी स्वत:ची सुटका करुन घेतली होती. आग्र्यावरुन सुटका या नावाने ओळखली जाणारी ही घटना १६६६ साली घडली होती. याच ऐतिहासिक गोष्टीच्या आधारे येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आग्र्यातील वास्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागे भाजपाची राजकीय खेळी असल्याचे सांगितले जात आहे. मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेबद्दल सध्या भाजपाचे फारसे जमत नाही. त्यामुळेच मागील दोन दशकांपासून महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला अप्रत्यक्षपणे शह देण्यासाठी हे नामकरण करण्यात आल्याचे राजकीय तज्ज्ञ मंडळी सांगतात.