Bollywood Movies with two intervals: दोन मध्यांतर असलेला भारतातील सर्वात पहिला सिनेमा कोणता, याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? खरं तर बॉलीवूडच्या दोन चित्रपटांमध्ये दोन मध्यांतर ठेवण्यात आले होते. दोन्ही चित्रपट ७० च्या दशकात आले होते. त्यापैकी एक चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती, ज्यामुळे तो ब्लॉकबस्टर ठरला होता. तर दुसरा चित्रपट मात्र फ्लॉप ठरला होता. या दोन्ही कल्ट क्लासिक कल्ट चित्रपटांची निर्मिती सहा वर्षांच्या अंतराने झाली होती. या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
आता बॉलीवूडमध्ये चित्रपटांची लांबी कमी होत आहे, सरासरी चित्रपट दोन ते अडीच तासांचे असतात. पण एक काळ असा होता की मोठ्या चित्रपटांची निर्मिती व्हायची. राज कपूर (Raj Kapoor) यांनी सर्वात मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यात ‘आवारा’ आणि ‘श्री ४२०’ यांचा समावेश आहे. राज कपूर यांनी ही संकल्पना इंडस्ट्रीत आणली, असं म्हणतात. मुख्य म्हणजे दोन मध्यांतर असलेले दोन्ही सिनेमे राज कपूर यांचेच आहेत.
दोन मध्यांतर असलेला पहिला चित्रपट
Sangam: ‘संगम’ हा दोन मध्यांतर असलेला पहिला चित्रपट होता. १८ जून १९६४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये राज कपूर, वैजंतीमाला, राजेंद्र कुमार यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट ४ तासांचा होता, त्यामुळे त्यात दोन मध्यांतर ठेवण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. १९६४ मध्ये या चित्रपटाने जगभरात आठ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
यात सुंदर व गोपाल नावाचे दोन मित्र राधा नावाच्या एकाच मुलीच्या प्रेमात पडतात, अशी गोष्ट दाखवण्यात आली होती. तीन तास ५८ मिनिटांचा असूनही हा चित्रपट त्याकाळी हिट ठरला होता.
दोन मध्यांतर असलेला दुसरा चित्रपट
Mera Naam Joker: ‘मेरा नाम जोकर’ हा दोन मध्यांतर असलेला दुसरा चित्रपट आहे. १८ डिसेंबर १९७० रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ तास १५ मिनिटांचा होता. ‘संगम’च्या तुलनेत ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता. ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट एका सर्कस कलाकाराच्या जीवनावर बेतलेला चित्रपट होता. यात मुख्य भूमिकेत राज कपूर होते. यामध्ये राज कपूर, ऋषी कपूर, सिमी गरेवाल, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र हे कलाकार होते.
‘संगम’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर राज कपूर यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘मेरा नाम जोकर’ बनवला. हा चित्रपटही बराच लांब असल्यामुळे त्यात दोन मध्यांतर ठेवण्यात आले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता.