शुकदेव परीक्षिती राजाला नारदांची आंतरिक स्थिती सांगताना म्हणतात, ‘‘नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान। त्यासी कां कृष्णमूर्तीचें ध्यान। श्रीकृष्णदेहो चैतन्यघन। यालागीं श्रीकृष्णभजन नारदा पढियें।। २८।।’’ नारद हा पूर्ण ब्रह्मज्ञानी होता आणि तरीही सगुण अशा कृष्णमूर्तीचं ध्यान त्याला आवडत होतं! जो निर्गुण निराकार अशा परब्रह्माशी सदैव एकरूप होता त्यालाही सगुण देहात प्रकटलेल्या कृष्णाचा ध्यास का लागावा? तर त्याचं कारण एकच की, हा कृष्ण देहधारी असला तरी त्याचा देह चैतन्यघन आहे. घन या शब्दात घनता आहे तसंच पाण्यानं पूर्ण भरल्याची स्थितीही आहे. अगदी त्याचप्रमाणे या कृष्णाच्या रोमारोमांत चैतन्यच व्याप्त आहे. तेव्हा कृष्णाचं ध्यान म्हणजे चैतन्य तत्त्वाचं ध्यान. पण प्रत्येकाला ही जाणीव थोडीच असते? शुकदेव सांगतात, ‘‘ऐकें बापा नृपवर्या। येऊनि उत्तमा देहा या। जो न भजे श्रीकृष्णराया। तो गिळिला माया अतिदु:खें।।३०।।’’ शुकदेव सांगत आहेत की, हे राजा, माणसाचा उत्तम देह लाभूनही जो श्रीकृष्णाला भजत नाही त्याला मायेनं गिळलं आहे आणि तो अतिदु:खं भोगत आहे, यात शंका नाही. जो सद्गुरू साक्षात चैतन्याचं स्वरूप आहे, परब्रह्म म्हणजे शाश्वत, सर्वव्यापक, सर्वज्ञ, अनादि अनंत आहे तो देहरूपात प्रकटला असताना त्याला सोडून ज्याला अशाश्वत, संकुचित, अज्ञानग्रस्त देहरूपांमध्ये देहबुद्धीनंच गुंतून राहण्यात सुरक्षित वाटतं त्याला मायेनंच गिळलं आहे आणि तो महादु:खाचाच भोक्ता ठरणार आहे! मनुष्याचा जन्म लाभल्यावर माणसानं प्रामुख्यानं काय केलं पाहिजे, हेच शुकदेवांच्या माध्यमातून नाथांनी स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली आहे. कन्फ्युशियस नावाचे एक तत्त्वज्ञ चीनमध्ये प्राचीन काळी होऊन गेले. त्यांचं एक वचन आहे की, ‘‘माणसाला दोन जीवनं लाभली असतात आणि जेव्हा आपल्याला एकच जीवन आहे, हे माणसाला उमगतं तेव्हा त्याचं दुसरं जीवन सुरू होतं!’’ वाक्य थोडं संभ्रमात टाकणारं वाटतं ना? पण ते फार अर्थगर्भ आहे. आपल्याला वाटेल की, जीवन तर एकच आहे. मग कन्फ्युशियस माणसाला दोन जीवनं लाभली आहेत, असं का सांगतात? तर याचं उत्तर अध्यात्मात आहे! आध्यात्मिक भान आल्याशिवाय आपल्या एकाच जीवनातली दोन जीवनं उमगू शकत नाहीत. हे भान आल्यावर काय होतं? तर, आध्यात्मिक जाण येण्याआधीचं जीवन आणि नंतरचं जीवन यातला भेद स्पष्टपणे लक्षात येतो. त्यामुळे कन्फ्युशियस यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, आध्यात्मिक भान येण्याआधीही आपण जगत होतोच, पण तेव्हा जीवनाचं खरं मोल कळलं नव्हतं. मन मानेल तसं जगणं सुरू होतं आणि त्यामुळेच अनेकदा दु:खंही वाटय़ाला येत होती. माणसाचा जन्म लाभणं ही किती दुर्लभ गोष्ट आहे, याची जाणीवच नव्हती. त्यामुळे सर्व क्षमतांचा बेजबाबदार वापर सुरू होता. देह केवळ मनाच्या ओढींनुसार राबवला जात होता. पण ज्या क्षणी जीवनाचं खरं मोल उमगलं आणि जगण्याची संधी फार वेगानं निसटत आहे, याची जाणीव झाली तेव्हा अवधानपूर्वक नव्यानं जगणं सुरू झालं. हेच दुसरं जीवन! अध्यात्माव्यतिरिक्त उच्च मूल्यांनुसार जगणाऱ्या माणसांनाही ही दोन जीवनं उकलतात. कारण ज्या मूल्यांनुसार ते आता जगत असतात त्या मूल्यांशी बऱ्याचदा त्यांचं पूर्वायुष्य विसंगत असतं, पण  जेव्हा तत्त्वभान येतं तेव्हा त्यांचंही नवजीवन सुरू होतंच.

– चैतन्य प्रेम