ठाणे लोकसभा मतदारसंघातील चार इच्छुकांचे अर्ज अवैध

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले असून त्यापैकी २५ उमेदवारांचे अर्ज वैध तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या शुक्रवापर्यंत असून या प्रक्रियेनंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतात, हे स्पष्ट होईल.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २ ते ९ एप्रिल दरम्यानची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले.

दाखल करण्यात आलेल्या अर्जात शिवसेनेचे राजन विचारे यांच्या चार तर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्या तीन अर्जाचा समावेश आहे. अनामत रकमेसाठी सुट्टे पैसे देणारे अपक्ष उमेदवार विनोद पोखरकर यांचे दोन अर्ज होते. उर्वरित उमेदवारांनी मात्र प्रत्येकी एक अर्ज केला आहे.

अर्जाची छाननी बुधवारी सकाळी झाली. त्यात २५ उमेदवारांचे ३० अर्ज वैध तर चार उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले. शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, वंचित आघाडीचे मलिकार्जुन पुजारी यांच्यासह विजय घाटे, माधवीलता मोर्या, प्रभाकर जाधव, सुधाकर शिंदे, ब्रह्मदेव पांडे, अजय गुप्ता, ओमकार तिवारी, अक्षय जोडघे, रमेशकुमार श्रीवास्तव, सुभाषचंद्र झा, हेमंत पाटील, राजेशचेन्ना जैस्वार, उस्मान शेख, ओमप्रकाश पाल, मोहमद चौधरी, दिलीप ओलोनी, सुरेंद्रकुमार जैन, विनोद पोखरकर, राजेश कांबळे, शुभांगी चव्हाण, दिगंबर बनसोडे, विठ्ठल चव्हाण यांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

यांचे अर्ज अवैध..

दत्तात्रय सावले, प्रमोद कांबळी, मुकेश तिवारी आणि राहुल कांबळे या चार जणांचे अर्ज अवैध ठरले. दत्तात्रय यांनी अर्जासोबत शपथपत्र सादर केले नव्हते. राहुल यांनी अर्जामध्ये नागरिकत्व, वय आणि पक्ष या रकान्यांत लागू होत नसल्याचे लिहिले होते. प्रमोद कांबळी आणि मुकेश तिवारी यांनी अर्ज पूर्ण भरला नव्हता. तिवारी यांनी अर्जावर स्वाक्षरीही केली नव्हती, अशी माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

चिल्लरचा ताप

२५ हजारांची अनामत रक्कम भरण्यासाठी अपक्ष उमेदवार विनोद पोखरकर यांनी चिल्लर दिली होती. त्यात एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. त्यासाठी चार अधिकारी नेमण्यात आले होते. विनोद यांच्या दोन अर्जापैकी एक वैध ठरला आहे.