उस्मानाबाद येथील जाहीर सभेत शरद पवार यांचे आवाहन

उस्मानाबाद : बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई, पशुधनावर ओढावलेले संकट, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न टाळून सत्ताधारी नको त्या विषयावर गप्पा मारत आहेत. शेतमालाला योग्य भाव, कमी व्याजाने कर्ज आणि दुष्काळात शेतकऱ्यांच्या खांद्यावर मदतीचा हात देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याकरिता विनाअट सरसकट कर्जमाफी हा एकमेव पर्याय आपल्यासमोर उरला आहे. त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन गरजेचे असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री आमदार मधुकर चव्हाण, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह शेकापचे भाई धनंजय पाटील आदींसह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ता केवळ मिरविण्यासाठी नसते. सत्तेतून मिळालेले अधिकार लोकांसाठी वापरायचे असतात. दुर्दैवाने राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना याची जाणीव राहिली नाही. शेती आणि शेतकऱ्यांविषयी यांना अजिबात आस्था नाही. आपण खाणाऱ्यांचा नव्हे तर पिकविणाऱ्यांचा विचार करतो. पिकविणाराच जगला नाही, तर खाणाऱ्यांसाठी विदेशातून अन्न आणावे लागेल. त्यासाठी कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यायला हवा, असेही पवार यांनी सांगितले.

पवारांच्या घरात मतभेद आहेत. त्यांचा पुतण्या ऐकत नाही, अशी चर्चा नरेंद्र मोदी करीत आहेत. दिल्लीत गेल्यानंतर त्यांची भेट घेऊन आपल्या घरातील मतभेद त्यांना कसे कळाले, याबाबत विचारणा करणार आहे. यांना कुटुंबाचा, घराचा अनुभव नसताना दुसऱ्याच्या घरात लक्ष घालीत आहेत. आमच्याकडे सांगण्यासारखे आणि बोलण्यासारखे खूप आहे. गावरान भाषेत आम्ही बोलायला सुरुवात केली तर पळता भुई थोडी होईल, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांची पवारांनी खिल्ली उडवली.

३५० कोटी रुपयांचे राफेल विमान एक हजार ७५० कोटीला खरेदी करून नरेंद्र मोदी कोणती देशसेवा करीत आहेत? उठसूट पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाने गळे काढणाऱ्या नरेंद्र मोदींनी भारताचा खरा इतिहास जाणून घ्यावा, असेही ते म्हणाले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट

शिवसेना उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची शरद पवार यांनी तडवळा येथे जाऊन भेट घेतली. ढवळे यांच्या मुलाला आपल्या संस्थेत नोकरी देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. तसेच राज्य सरकारने तत्काळ मोठय़ा स्वरूपात आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली. अद्याप गुन्हा नोंद न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून ताबडतोब गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली. तसेच गुन्हा नोंद न झाल्यास तो कसा नोंद करवून घ्यावयाचा हे देखील आपल्याला चांगले कळते, अशा शब्दात सूचक इशाराही दिला.