पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलं. त्यानंतर सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज भाजपाच्या आमदाराने सोनिया गांधी यांचा उल्लेख विषकन्या असा केला आहे.

काय म्हटलं आहे भाजपाचे आमदार बासनगौडा यांनी?

“सोनिया गांधी या विषकन्या आहेत. सगळ्या जगाने मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. एक काळ असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. नंतर त्यांनी रेड कार्पेट टाकलं आणि मोदींचं स्वागत केलं. आता मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप असं म्हटलं आहे. ते विष ओकत आहेत असं म्हटलं होतं. मात्र मी खरगेंना सांगू इच्छितो की ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं.” असं म्हणत भाजपा आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधींवर टीका केली.

मल्लिकार्जुन खरगे यांनी काय म्हटलं होतं?

गुरुवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप आहेत. ते विष ओकत असतात. तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात तरीही तुम्ही मरुन जाल. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टीकरण दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरगेंनी यानंतर काय स्पष्टीकरण दिलं?

भाजपाने मल्लिकार्जुन खरगेंवर टीका केल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. तर मी त्यांची विचारधारा विषारी आहे या अर्थाने म्हटलं होतं, असं स्पष्टीकरण मल्लिकार्जुन खरगेंनी दिलं आहे.