निवडणूक आयोगाला आम्ही १७ पत्रं लिहिली आहेत. तरीही काहीही उपयोग झालेला नाही, आमच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही. भाजपाला मतदान करा, रामलल्लाचं फूकट दर्शन घडवू या घोषणेची तक्रार करणारं पत्रही आम्ही पाठवलं. त्याची तर पोचही आम्हाला निवडणूक आयोगाने पाठवली नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्यापैकी १७ पत्रांपैकी एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही

१७ पत्रांपैकी एकाही पत्राला उत्तर देण्यात आलेलं नाही. महाराष्ट्रात यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे, पैशांचं वाटप सुरु आहे. मुख्यमंत्री, भाजपाचे नेते यांच्यासंदर्भातल्या या तक्रारी आहेत. याची दखल घेण्यात आलेली नाही. मात्र २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यासंदर्भात भाजपाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि केंद्रीय निवडणूक आयोग किती तत्परतेने कारवाईचे आदेश देतो, आम्ही या कारवाईचं स्वागत करतो. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे

केंद्रीय निवडणूक आयोग हा भाजपाची एक शाखा आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र नाही, निष्पक्षपणे वागत नाही. या सगळ्याचा जाब त्यांना उद्या संध्याकाळनंतर द्यावा लागणार आहे. नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? सर्व वृत्तवाहिन्यांच्या १० कॅमेरे लावून ध्यान करायला बसले. सगळ्या माध्यमांकडून त्याचं चित्रीकरण चोवीस तास करण्यात आलं. तीदेखील एक मूक पत्रकार परिषदच होती. त्यावर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले नाहीत कारण बहुदा निवडणूक आयोगही ध्यानाला बसला होता असंच म्हणावं लागेल. आमच्याकडे २४ तास आहेत. उद्या दुपारनंतर पाहू कोण कोणावर कारवाई करतं आहे?

हे पण वाचा- “आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका या…”, रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही

कुठल्या आचारसंहितेचं उल्लंघन उद्धव ठाकरेंनी केलं? २० मे रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण तो काही प्रचाराचा भाग नव्हता. पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. मात्र मुंबईतले भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाने लगेच कारवाई केली. उद्या ४ नंतर निवडणूक आयोगासारख्या भाजपाच्या सगळ्या शाखा बरखास्त होतील. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडू, जिलबी, बासुंदी, फाफडा वाटा तरीही पराभव भाजपाचाच

ज्या १५० मतदारसंघात धमक्या दिल्या जात आहेत त्यातले १२ मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत अशी माझी पक्की माहिती आहे. उद्या भाजपाचा पराभव होणार आहे. लाडू वाटा, जिलबी वाटा, बासुंदी वाटा, फाफडा वाटा आणि सगळ्या लोकांना वाटा कारण तुमचा पराभव निश्चित आहे, लोक आनंद उत्सव साजरा करतील. उद्या संध्याकाळी ४ नंतर माजी पंतप्रधान होतील आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल, त्यानंतर चोवीस तासांत आमचा पंतप्रधान जाहीर होईल असाही दावा संजय राऊत यांनी केला. पंतप्रधानपदावर आमच्या आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. उद्या सगळे निकाल लागले आणि इंडिया आघाडीचा विजय जाहीर झाला की आम्ही पंतप्रधानपद ठरवू. लोकांना मोदी सध्या भ्रमात टाकत आहेत, उद्यापासून ते माजी पंतप्रधान असतील.