येत्या ४ जून रोजी देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच माझा १०० दिवसांचा आराखडा तयार असून मी ४ जूननंतर एकही दिवस वाया घालवणार नाही, असेही ते म्हणाले. टाईम्सनाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“एखाद्या गोष्टीचे आगाऊ नियोजन करणे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. ही एक प्रकारे दैवी शक्तीच म्हणावी लागेल. माझे सॉफ्टवेअर कदाचित अशा प्रकारेच डिझाइन केले गेले आहे. मला याआधी गुजरातमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. २०१४ आणि २०१९ मध्येही माझ्याकडे योजना तयार होती. मागील १० वर्षात आम्ही जे काम केले आहे, ते जनतेने बघितले आहे. आम्ही तिहेरी तलाक विरोधात कायदा आणला. तसेच जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला. आता आणखी काही मोठे निर्णय घ्यायचे आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा १०० दिवसांचा आराखडा तयार आहे. ४ जूननंतर मला एक दिवसही वाया घालवयाचा नाही. विलंबाने निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे देशाला बराच त्रास सहन करावा आहे. मला असे होऊ द्यायचे नाही. गेल्या १० वर्षात तुम्ही केवळ माझ्या कामाचा ट्रेलर बघितला आहे. यापुढे बरंच काही बघायचं आहे.”

हेही वाचा – “काँग्रेसच्या डीएनएमध्ये रामद्रोह”; राधिका खेरा यांच्या आरोपानंतर योगी आदित्यनाथांची …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशात समान नागरी कायदा लागू होईल का, असे विचारले असता, “समान नागरी कायदा हा मोदी सरकारचा किंवा भाजपाचा मुद्दा नाही. याची तरतूद संविधान निर्मात्यांनी घटनेत करून ठेवली आहे. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा समान नागरी कायदा लागू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे”, असे ते म्हणाले.