शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी त्यांचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी संजय राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर बारीक लक्ष होतं. आजही शिवसेना पक्षप्रमुखांचं (उद्धव ठाकरे) ठाण्यावर तितकंच लक्ष आहे. ठाणे हा आपला किल्ला आहे आणि आपण येथील लोकसभा निवडणूक सहज जिंकू.” संजय राऊत यावेळी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दलही बोलले. राऊत म्हणाले, आनंद दिघे यांची संपत्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते. परंतु, आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाचा सातबारा तोतया मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावावार केला आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणाले, इथे जे नासके म्हस्के आंबे आहेत त्यांना जनता इथेच ठेवणार आहे आणि राजन विचारे यांना निवडून देणार आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक शिवसैनिकही आहेत, त्यांचा राजन विचारे यांना पाठिंबा आहे. आम्हाला म्हणजेच महाविकास आघाडीला दोन मतदारसंघांमध्ये प्रचाराची अजिबात गरज नाही. ते दोन मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि बारामती. ठाण्यात नासके म्हस्केंच्या प्रचाराला तोतया मुख्यमंत्री येतात. मात्र या तोतया मुख्यमंत्र्याच्या पार्श्वभागावर सुप्रीम कोर्टाने कधीच लाथ मारली आहे.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला (श्रीकांत शिंदे) ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं करायला हवं होतं. त्यांचा मुलगा इथे पडला असता. म्हणजे तो कल्याण डोंबिवलीतून लढतोय याचा अर्थ आमचं कल्याण डोंबिवलीवर लक्ष नाही असं नाही. कल्याण डोंबिवली मतदारसंघही आमचाच आहे आणि आमचाच उमेदवार तिथे निवडून येणार.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

राऊत म्हणाले, ४ जूननंतर इथली जनता एकनाथ शिंदेंना ठाण्यातून पळवून लावेल आणि मोदी नावाचं पार्सल हिमालयात जाणार. त्यामुळे मला वाटतं की, अमित शाह आणि नरेंद्र मोदींचा पासपोर्ट आत्ताच जप्त करायला हवा. कारण त्यांनी या देशाच्या बाबतीत भयंकर अपराध केले आहेत. ब्रिटिशांनी आपल्या देशाला जेवढं लुटलं नसेल, तेवढे या दोघांनी लुटलं आहे. त्यांच्याकडे दरोडेखोर कमी पडले म्हणून त्यांनी आमचे ४० आणि राष्ट्रवादीचे ४० जण नेले. मी राजन विचारे यांना एवढंच सांगेन, तू घाम गाळू नकोस, कार्यालयात बसलास तरी लोक तुला भरपूर मतदान करतील.