– यादव तरटे पाटील

वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराची प्रक्रिया सतत व निरंतर चालणारी आहे. मात्र कालानुरूप मानवामुळे यामध्ये व्यत्यय निर्माण झाला. वाघांच्या नैसर्गिक स्थालांतरासाठीचे संचार मार्ग आता आकुंचन पावलेले आहेत. तर काही ठिकाणी ते नष्ट होण्याच्या मार्गावरही आहेत. त्यामुळे वाघांच्या स्थलांतराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा प्रवास आता कृत्रिम स्थलांतरणाकडे वळला आहे. एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात वाघांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरूच असते. मात्र, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच काही महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दोन वाघांना कृत्रिमरित्या सोडण्यात आले. या प्रयोगाकडे सकारात्मकरित्या पाहिले तरीही वाघांच्या आणि मानवाच्या संघर्षाची धार यातून किती कमी करता येईल हा येणारा काळच सांगेल.

वाघ नैसर्गिक स्थलांतर का करतात?

नवीन अधिवास शोधणे, वंशवृद्धी व वंशसमृद्धीसाठी नवीन जोडीदार शोधणे, खाद्यासाठी भटकंती करणे, एकाच परिसरात एकाहून अधिक वाघ झाल्यास एकाला तो परिसर सोडून नव्या ठिकाणी जावे लागणे… थोडक्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाघ स्थलांतर करतात. वाघांच्या स्थलांतराचे नैसर्गिक मार्ग ठरलेले आहेत. अलीकडच्या काळात ‘रेडिओ कॉलर’सारख्या आधुनिक पद्धतीमुळे यातील अनेक बारकावे व नवनवीन शोध पुढे आलेत. जगातील सर्वाधिक मोठ्या अंतराचे वाघांचे स्थलांतर महाराष्ट्रात झाले.

हेही वाचा : व्याघ्र संवर्धनावरच भर का?

वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणाची गरज का?

विकासाच्या गाडीच्या सुसाट वेगामुळे वन्यप्राण्यांच्या, पर्यायाने वाघांच्या अधिवासाला कात्री लागून जंगले कमी होत आहे. भारतात दर दिवसाला ३५ हेक्टर जंगल नष्ट होत आहे. विशेष म्हणजे जंगलालगत येणाऱ्या प्रकल्पांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्यामुळे, खेडी फुगत चालल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा येत आहे. गेल्या शतकात वाघांच्या अधिवासात तब्बल ५७ टक्के लोकसंख्या वाढ झाली. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. वन्यप्राण्यांची शिकार आणि बेकायदा तस्करी या समस्या वाढत आहेत. मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. एकाच विशिष्ट क्षेत्रात वाघ अडकून राहिल्यास जनुकीय समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाघांचे नैसर्गिक स्थलांतर आवश्यक आहे. जेरबंद केलेल्या वाघांच्या बाबतीमध्ये रेस्क्यू सेंटर व प्राणी संग्रहालय यांची क्षमता पूर्ण झालेली आहे.

वाघांच्या स्थलांतरणासाठी आवश्यक बाबी कोणत्या?

स्थानिक नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक स्थलांतर असेल तर बऱ्याच गोष्टी सुलभ होतात. मात्र, कृत्रिम स्थलांतरण करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सर्वांत मोठा फरक हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा असतो. स्थानिक वनस्पती, तापमान, पाणी इतर जैविक विविधता यात फरक असतो. अन्नसाखळी जरी सारखी असली तरी परिसर मात्र पूर्णत: नवीन असतो. पुनर्स्थापना करण्यात येणाऱ्या वाघांच्या बाबतीत स्थानिक अधिवास, त्यांच्या खाद्याच्या सवयी व ज्या ठिकाणी त्यांना पुनर्स्थापित करण्यात येणार, त्यातील आव्हानांचा गांभीर्याने अभ्यास होणे गरजेचे आहे. हा प्रकल्प प्रयत्न व प्रमाद (Trial & Error) पद्धतीवर अवलंबून असल्यास त्याच्या यशस्वीतेसाठी किती व कसे प्रयत्न झाले आहेत व करण्यात येणार आहेत, भविष्य काय असणार आहे, असे प्रश्न आहेत. मूळ अधिवासाप्रमाणेच अधिवासाचे व्यवस्थापन केल्यानंतरही त्यांच्यासाठीच्या या अधिवासात, वातावरणात वाघ जुळवून घेतीलच असे नाही. सोडलेले प्राणी कधी-कधी त्यांच्या वागणुकीत वेगवेगळे बदल दर्शवतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणारा काळच सांगेल. या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.

हेही वाचा : विश्लेषण : जागतिक व्याघ्रसंवर्धनासाठी भारताचा पुढाकार… काय आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स?

अभ्यास न करता स्थलांतरण केल्यास धोका कोणता?

स्थलांतरण करताना प्राण्यांच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास करावा लागतो. तो न करता केलेले स्थलांतरण अयशस्वी ठरू शकते. वाघ नवीन वातावरणाला स्थिरावतील का, स्थिरावल्यावर मीलनासाठी एकत्र येऊ शकतील का, खाद्याची घनतेनुरूप अनुकूलता साधता येईल का, जुन्या अधिवासात पाळीव प्राणी खायची लागलेली सवय, नवीन ठिकाणी नैसर्गिक खाद्य जसे सांबर, चितळ व इतर वन्यप्राणी पकडून शिकार करण्याची तयारी किती, असे अनेक संभावित धोके नाकारता येणार नाहीत.

भारतात वाघांचे यशस्वी स्थलांतर कोणत्या राज्यात?

महाराष्ट्र हे नैसर्गिक स्थलांतराच्या बाबतीत भारतात अग्रेसर आहे. ‘वॉकर’चा ३२०० किलोमीटर प्रवास, तर बोर व्याघ्र प्रकल्पातील व नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर कोंढाळी भागातील ‘नवाब’ वाघ अनुक्रमे १०० व १३० किमी प्रवास करून अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड राखीव जंगलात आले होते. मात्र कृत्रिम स्थलांतरणाचा प्रयोग नव्यानेच आपण आत्मसात करतो आहोत.

वन्यजीव आरक्षित जंगलातील वाघ प्रादेशिक जंगलात जात आहेत मात्र पुढील आव्हानांचे काय? व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये यासारखी अतिसंरक्षित जंगले वाघांसाठी राखीव असतांना इतर जंगलामध्ये तब्बल ३५ टक्के वाघांचा वावर आहे. म्हणजेच ताडोबा व टिपेश्वरसारख्या जंगलांची धारण क्षमता संपली असताना, संरक्षित जंगलाच्या बाहेरील प्रादेशिक जंगलात त्यांच्यासाठी आवश्यक वन्यजीव व्यवस्थापन होत आहे का? त्या जंगलाची धारण क्षमता पूर्ण होण्याच्या मार्गावर असतांना वन विभागाचे पुढील नियोजन कसे असणार आहे? या प्रश्नांची उत्तरे वेळीच शोधावी लागतील.

लेखक राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.

संपर्क – ९७३०९००५००

Mail Id – yadavtarte@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेबसाईट : http://www.yadavtartepatil.com