Could Elon Musk be deported from the US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. मागील काही दिवसांपासून दोघेही एकमेकांवर टीकेचा प्रहार करताना दिसून येत आहेत. ‘वन बिग ब्यूटीफुल बिल’ या विधेयकावरून दोघांमध्येही मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आम्ही २५० दशलक्ष डॉलर्सचा खर्च केला, असं विधान मस्क यांनी गेल्या महिन्यात केलं होतं. आता मंगळवारी माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी मस्क यांना थेट अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरंच असा निर्णय घेऊ शकतात का? त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत जाणून घेऊ…
टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हे गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार करताना दिसून येत आहेत. ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘वन बिग ब्यूटीफुल बिल’ या विधेयकाला त्यांनी जोरदार विरोध केला आहे. या विधेयकामुळे श्रीमंतांना करामध्ये सवलत मिळून देशावर अब्जावधी डॉलर्सचा कर्जभार पडणार आणि लाखो नागरिकांचे आरोग्य विमा कवच हिरावले जाणार, असं मस्क यांचं म्हणणं आहे. जर हे विधेयक मंजूर करण्यात आलं तर त्याचे राजकीय परिणाम गंभीर असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काहीही झालं तरी आगामी निवडणुकीत मी सत्ताधाऱ्यांचा नक्कीच पराभव करणार, अशी पोस्ट मस्क यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी नवा राजकीय पक्ष काढण्याचा विचारही मांडला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला संताप
एलॉन मस्क यांनी केलेल्या या टीकेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. “मस्क यांच्या टेस्ला व स्पेसएक्स या कंपन्या ज्या सरकारी अनुदानांवर चालतात, ते अनुदान बंद केलं तर त्यांना अमेरिकेतील दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावं लागेल,” असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. “एलॉन मस्क यांना हे खूप आधीपासून माहीत होतं की, मी इलेक्ट्रिक वाहनांच्या सक्तीविरुद्ध आहे. ही सक्ती हास्यास्पद असून माझ्या प्रचाराचा तो कायम महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या आहेत, पण सगळ्यांनीच तीच वापरावी असं बंधन नको,” असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी अमेरिकन खर्चावर लक्ष ठेवून असलेल्या DOGE (सरकारी खर्च विभाग) विभागाला मस्क यांच्या कंपन्यांच्या निधीची चौकशी करण्यास सांगितले आहे.
आणखी वाचा : पाकिस्तानला मिळणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद; कोणत्या आधारावर झाली निवड?
मस्क यांना अमेरिकेतून हद्दपार केले जाऊ शकते का?
- एलॉन मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक असून सध्या ते अमेरिकेत स्थायिक आहेत.
- २००२ मध्ये मस्क यांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर अमेरिकेचं नागरिकत्व मिळविलं आहे.
- एलॉन मस्क यांना देशातून हद्दपार करणे ही ट्रम्प यांच्यासाठी इतकी सोपी बाब नाही.
- एलॉन मस्क यांना अमेरिकेतून हद्दपार करायचे असेल तर ट्रम्प यांना कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल.
- अमेरिकेच्या संविधानानुसार, जर एखाद्या व्यक्तीने नागरिकत्व मिळवताना खोटी माहिती दिली असेल तर त्याचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं.
- एकदा नागरिकत्व रद्द झालं तर ती व्यक्ती विदेशी नागरिक ठरते आणि मग हद्दपारीची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
- एलॉन मस्क यांनी अमेरिकेत येताना गैरवापर केल्याचा आरोप होता. मात्र, हा खटला काही वर्षांपूर्वीच बंद झालेला आहे.
- सध्या तरी मस्क यांच्या नागरिकत्वावर किंवा स्थलांतरावर कोणतेही कायदेशीर प्रश्न उपस्थित नाहीत.
- मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना हद्दपारीचा इशारा दिल्याने हा वाद आगामी निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे.

अमेरिकेतून हद्दपारीची प्रक्रिया कशी सुरू होते?
जर एखाद्या व्यक्तीने अमेरिकेचं नागरिकत्व मिळविताना चुकीची माहिती दिली असेल तर त्याची चौकशी करण्यात येते. अमेरिकन नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभाग संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल न्याय विभागाकडे पाठवतात. त्यानंतर फेडरल कोर्टात या संदर्भातील खटला दाखल होतो. आरोपी व्यक्तीला न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो किंवा ती व्यक्ती स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकते. जर संबंधित व्यक्तीचं नागरिकत्व रद्द झालं, तर तत्काळ त्याची हद्दपारी होऊ शकते. गुन्हेगारी आरोप ठरले तर तुरुंगवासाची शिक्षा होऊन मग हद्दपारी केली जाते. मात्र, ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. यासाठी अमेरिकन सरकारला न्यायालयात अत्यंत ठोस आणि शंकाविरहित पुरावे सादर करावे लागतात. अशा खटल्यात सरकारला हे सिद्ध करावं लागतं की, त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे ठोस असून त्यावर कुठलीही शंका घेण्यास वाव नाही.
हेही वाचा : पाकिस्तान पुन्हा भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत? मुनीर यांच्या ‘त्या’ विधानानं वाढला संशय
मस्क यांना हद्दपार करण्याची योजना कुणाची?
ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या ‘वन बिग ब्यूटीफुल बिल’या विधेयकाला एलॉन मस्क यांनी विरोध केल्यानंतर अमेरिकेत राजकीय वादंग निर्माण झाला. त्यानंतर ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी मस्क यांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची मागणी जूनमध्ये केली होती. त्यांच्या या मागणीनंतर एलॉन मस्क यांनी संताप व्यक्त करीत अमेरिकन सरकार व डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांच्या या टीकेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं. आता ट्रम्प व मस्क यांच्यातील संघर्ष आणखीच तीव्र झाला असून हद्दपारीविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
ट्रम्प व मस्क यांच्यातील संबंध सुधारणार का?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांची ओळख आहे. जर ट्रम्प यांनी त्यांच्या हद्दपाराची योजना आखली तर मस्क हे अत्यंत कुशल आणि महागड्या वकिलांच्या माध्यमातून कायदेशीर लढा देऊ शकतात, त्यामुळे कायदेशीर लढाईत त्यांना सहज पराभूत करणं हे ट्रम्प यांच्यासाठी कठीण मानलं जात आहे. दुसरी बाब म्हणजे- हा वाद टाळण्यासाठी ट्रम्प आणि मस्क यांच्यात तडजोड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले ट्रम्प हे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे; त्यामुळे आगामी काळात डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांच्यातील मतभेद सुधारल्यास आश्चर्य वाटायला नको, असंही त्यांनी म्हटलं आहे.