दत्ता जाधव

भारताचा हवामान विभाग (आयएमडी) अत्याधुनिक उपकरणे, उपग्रह, रडारने संकलित केलेली माहिती, ‘एल निनो’सारख्या स्थितीच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषण करून मोसमी पावसाविषयीचा अंदाज व्यक्त करीत असतो. तरीही आजच्या संगणक युगातही पारंपरिक पद्धतीने गुढी पाडव्याच्या दिवशी गावोगावच्या मंदिरात, पारांवर पंचांगाचे वाचन केले जाते. प्रामुख्याने वार्षिक पर्जन्य विचार जाणून घेऊन शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतात. दाते आणि रुईकर पंचांगात व्यक्त केलेल्या अंदाजाविषयी…

पावसाच्या आमगनाविषयी पंचांगकर्त्यांचा अंदाज काय ?

केरळच्या किनारपट्टीवर मोसमी पावसाचे आगमन नेहमीच्या वेळेच्या आसपास होईल. पण, महाराष्ट्रात साधारणपणे आठ दिवस उशिराने म्हणजे पंधरा जूनच्या दरम्यान मोसमी पाऊस सुरू होईल. आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, पूर्वा आणि उत्तरा या पावसाळी नक्षत्रांच्या काळात चांगला पाऊस पडेल. मात्र, एकंदरीत पर्जन्यमान मध्यम राहील. सरासरीइतका पाऊस होईल असे वाटत नाही, असा अंदाज दाते पंचांगात व्यक्त केला आहे. रुईकर पंचांगात जून मध्यापासून कारवार, कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.

जून, जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज काय?

आठ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. नक्षत्राचे वाहन पर्जन्य सूचक हत्ती असून, ८ जून ते १२ जून दरम्यान चांगला पाऊस होण्याचा आणि देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दाते पंचांगात दिला आहे. रुईकर पंचांगात आठ जूनपासून वीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. आर्द्रा नक्षत्र २२ जूनला सुरू होते. नक्षत्र वाहन मेंढा असून, कोकण, मुंबई आणि गोव्यात अतिवृष्टीसह २३ ते २७ जून आणि ४, ५ जुलै रोजी चांगला पाऊस दाते पंचांगकर्त्यांना अपेक्षित आहे. रुईकर पंचांगात २३ जून ते २८ जून आणि जुलै २, ४ रोजी मिरज, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, नाशिकमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुनर्वसु नक्षत्रात पश्चिम महाराष्ट्रात ६ ते ८ व १६ ते १९ जुलै काळात पाऊस अपेक्षित आहे. पुष्य नक्षत्रात २० ते २४ जुलै आणि एक, दोन ऑगस्टला विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे दाते पंचांगात म्हटले आहे. रुईकर पंचांगात पुनर्वसु नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात नगर, सोलापूर, खान्देश, धुळ्यात चांगला पाऊस पडेल. राज्यातील काही नद्यांना पूर येण्याचा अंदाज आहे. समुद्र किनारपट्टीवर वादळामुळे नुकसानीचा अंदाज आहे. पुष्य नक्षत्रात २० ते ३१ जुलै या काळात पावसाचा अंदाज आहे.

विश्लेषण : श्रीमंतांच्या हौसेमुळेच शहरांमध्ये पाणीसंकट? केपटाऊन शहराविषयी केसपेपर काय सांगतो?

ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार?

आश्लेषा नक्षत्र तीन ऑगस्टला सुरू होते. या नक्षत्रात पावसात मोठा खंड पडण्याचा आणि पाऊस हुलकावणी देण्याचा अंदाज दाते पंचांगात आहे. मघा नक्षत्रात ऑगस्टच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस अपेक्षित आहे. रुईकर पंचांगात, काही ठिकाणी पावसाचा अभाव राहील, पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषकरून जुलैनंतर एल-निनोचा प्रभाव वाढून त्याचा मोसमी पावसावर परिणाम होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शिवाय स्कायमेट या खासगी संस्थेनेही एल निनोच्या परिणामाचा अंदाज व्यक्त केला आहे.

शेवटच्या टप्प्यात पाऊस कसा असेल?

दाते पंचांगात पूर्वा नक्षत्रात (३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर) समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. रुईकर पंचांगात सप्टेंबरच्या सुरुवातीस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. पण, राज्याच्या अनेक भागात पावसाचा खंड पडण्याचा अंदाज आहे. उत्तरा नक्षत्राचे (१३ ते २७ सप्टेंबर) वाहन हत्ती असून, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात १३ ते १६ आणि २४, २५, २६ सप्टेंबर रोजी पाऊस अपेक्षित आहे. रुईकर पंचांगात सप्टेंबरच्या अखेरीस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. हस्त नक्षत्रात (२७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर) २७ ते ३० सप्टेंबर, ६ ते ९ ऑक्टोबर काळात पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या अनेक भागात खंड पडण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीस पावसाचा अंदाज आहे. चित्रा नक्षत्राच्या (११ ते २३ ऑक्टोंबर) शेवटी १३, १४ आणि २० ते २३ ऑक्टोबरला पाऊस अपेक्षित आहे.

दसरा, दिवाळीत पाऊस?

स्वाती नक्षत्र (२४ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर) २४ ऑक्टोबरला सुरू होते. अखेरच्या पाच दिवसांत आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस पाऊस अपेक्षित आहे. रुईकर पंचांगात ऑक्टोबरअखेरीस पावसाचा अंदाज आहे. २४ ऑक्टोबरला दसरा असून, याच दिवशी स्वाती नक्षत्र सुरू होत असून, २४, २५, २६ रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुईकर पंचांगात विशाखा नक्षत्राचा पाऊस ७,१३, १५ नोव्हेंबर रोजी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिवाळी ९ नोव्हेंबरला सुरू होऊन १५ नोव्हेंबरला संपणार आहे. नेमक्या याच दिवसांत पावसाचा अंदाज आहे.

विश्लेषण : समृद्धी महामार्गावरील अपघात कसे रोखणार?

पंचांगकर्त्यांचा कमी पावसाचा अंदाज?

मोसमी पावसाचे केरळमध्ये वेळेत आगमन होईल. मात्र, राज्यातील आगमन सरासरीच्या आठ दिवस उशिराने होईल. १५ जून ते ३० जुलै आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा खंड पडेल. एकंदरीत सरासरीपेक्षा कमी पाऊसमानाचा अंदाज आहे, असे मत दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले आहे. रुईकर पंचांगचे श्रीगुरु मुकुंद रुईकर म्हणाले,की राज्यात मोसमी पावसाला उशिराने सुरुवात होईल. यंदा पाऊस कमी नाही, पण सरसकट पडणार नाही. काही भागात जास्त तर काही भागात कमी पडेल. पावसात अनेकदा पावसात खंड पडेल. जुलैमध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल, पण, थोड्या दिवसांसाठीच असेल. पाऊस असमान पडण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dattatray.jadhav@expressindia.com