Parle-G Biscuit Price in Gaza : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व खपणारे बिस्कीट म्हणून ‘Parle-G’ची ओळख… गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांचं बिस्कीट म्हणून पार्ले-जीने प्रसिद्धी मिळवली. कोणालाही परवडेल इतक्या पैशात हे बिस्कीट कोणत्याही दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध होतं. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १०० रुपयांना मिळणारे Parle-G बिस्कीट गाझामध्ये तब्बल २३०० रुपयांना विकले जात असल्याचं समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, यात पॅलेस्टाईनमधील एक व्यक्ती त्याच्या चिमुकलीला पार्ले-जी बिस्किटचा पुडा देताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, गाझामध्ये पार्ले-जीची किंमत कशामुळे वाढली? त्यामागचे नेमके कारण काय? याबाबत जाणून घेऊ…
गेल्या काही वर्षांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून हजारो निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे हमासच्या गाझा पट्टीतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिसरात अन्नधान्यांच्या व दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १०० रुपयांना विकले जाणारे Parle-G बिस्कीट गाझामध्ये २३०० रुपयांना मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
- गाझा पट्टीतील रहिवासी मोहम्मद जव्वाद यांनी त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवरून एक भावनिक व्हिडीओ शेअर केला.
- या व्हिडीओत मोहम्मद जव्वाद हे त्यांच्या मुलीला ‘Parle-G’ बिस्कीट देताना दिसून येत आहेत.
- व्हिडीओबरोबर पोस्ट केलेल्या मजकुरात मोहम्मद म्हणतात, “खूप वाट पाहिल्यानंतर आज मी माझी मुलगी रफीफसाठी तिचं आवडतं बिस्कीट घेऊन आलो.
- गाझामध्ये ‘Parle-G’ बिस्किटाची किंमत १.५ युरोवरून २४ युरोपेक्षा जास्त झाली असली, तरी मी रफीफला तिची आवडती वस्तू देण्यास नकार देऊ शकलो नाही, असं मोहम्मद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं.
आणखी वाचा : आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी अटक झालेले निखिल सोसाळे कोण आहेत?
भारतात पाच रुपयांना विकले जाणारे पार्ले-जी बिस्कीट पॅलेस्टाईनमध्ये २३०० रुपयांना मिळत असल्याचे पाहून अनेकांनी त्यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना टॅग करत असं लिहिलंय की, “व्हिडीओत दिसणारी ही चिमुरडी भारताचं आवडतं बिस्कीट खात आहे. भारताची या युद्धाबाबतची भूमिका तटस्थ असली, तरी आपण पॅलेस्टाईनला थोडी जास्त ‘Parle-G’ बिस्कीट पाठवू शकतो का? हे ग्लुकोजचे बिस्कीट आहे आणि सामान्य जनतेसाठी ते उपयुक्त ठरेल.” दुसऱ्या युजरने लिहिलंय की, रफीफला तिच्या आवडत्या सगळ्या बिस्किटांचा हक्क आहे. तिचं कुटुंब सुरक्षित राहो, अशी आम्ही प्रार्थना करतो. दरम्यान, ही बिस्किटं मदतीच्या स्वरूपात पाठवली जातात, मग ती काळ्या बाजारात कशी विकली जात आहेत? असा प्रश्नही एका वापरकर्त्याने उपस्थित केला आहे.
गाझामध्ये ‘Parle-G’ इतकं महाग कसं मिळतंय?
गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा व्यवस्था ढासळल्याने खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्या आहेत, त्यामुळे परदेशातून येणाऱ्या मदतीवरच देशातील अनेकांची निर्भरता आहे. मात्र, ही मदत आमच्यापर्यंत पोहोचत नसून तिची काळ्या बाजारातून खुलेआम विक्री केली जाते, असा आरोप गाझामधील लोक करीत आहेत. Parle-G सारख्या बिस्किटांचा उच्च ऊर्जा देणाऱ्या अन्नपदार्थांच्या यादीत समावेश असल्याने युद्धग्रस्त भागात त्याची मागणी वाढत आहे. त्यातच पुरवठा कमी होत असल्याने पार्ले-जीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
गाझा शहरातील ३१ वर्षीय सर्जन डॉ. खालिद अलशाव्वा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, जगभरातील अनेक देशांमधून पार्ले-जी बिस्किटांचे पॅकेट्स गाझामध्ये पोहोचत आहेत. युद्धग्रस्त भागातील पीडितांना या बिस्किटांचे मोफत वाटप करण्यात यावं असं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त काही मोजक्या लोकांपर्यंतच ही मदत पोहोचत असून उरलेल्या वस्तू काळ्या बाजारात विकल्या जात आहेत, त्यामुळेच पार्ले-जी बिस्किटांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. NDTV च्या अहवालानुसार, गाझामध्ये पाठविण्यात येणारे ‘Parle-G’ बिस्किटाच्या पॅकेट्सवर ‘EXPORT PACK’ असं नमूद करण्यात आलं आहे. त्यावर कोणतीही किंमत छापण्यात आलेली नाही.
हेही वाचा : चीनच्या ‘त्या’ धोरणाचा भारताला फटका; सुझुकीने थांबवले स्विफ्ट कारचे उत्पादन, कारण नेमके काय?
जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री
NDTV च्या रिपोर्टनुसार, उत्तर गाझामध्ये एक किलो साखरेची किंमत अंदाजे चार हजार ९१४ रुपये इतकी आहे, तर एक किलो कांद्याची विक्री चार हजार ४४३ रुपयांना केली जात आहे. इस्रायलच्या सैन्याने १८ मार्चपासून हमासच्या गाझा क्षेत्रात पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. तेव्हापासून गव्हाच्या पिठाच्या किमतीत पाच हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर खाद्यतेल १२०० टक्के चढ्या दराने विकले जात आहे. ‘Time Magazine’ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, गाझामध्ये दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. ‘Integrated Food Security Phase Classification’ (IPC) या जागतिक संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, गाझाचा संपूर्ण भाग सध्या आणीबाणीच्या अवस्थेत आहे. या अहवालानुसार, १२ मे २०२५ पर्यंत गाझामधील सुमारे ४.७ लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या मृत्यूचा धोका वाढला आहे.
गाझामधील मानवी संकट दिवसेंदिवस गंभीर
अहवालानुसार, गाझातील सुमारे २० लाख लोकसंख्या आता जवळपास पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे, कारण इस्रायली हल्ल्यांमुळे स्थानिक अन्न उत्पादन व्यवस्थाच नष्ट झाली आहे. २ मार्च २०२५ रोजी इस्रायलने गाझामध्ये पुरवठा रोखणारा नाकेबंदी आदेश लागू केला होता. मात्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि दुष्काळाबाबतच्या तीव्र इशाऱ्यांनंतर मागील महिन्याच्या अखेरीस इस्रायलने हा आदेश मागे घेतला. पॅलेस्टाईनमधील परिस्थितीबाबत बोलताना संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टेफेन दुजारिक म्हणाले की, सध्या गाझामध्ये जी मदत पोहोचत आहे, ती अजूनही अपुरी आहे. दुसरीकडे इस्रायलने आरोप केलाय की, गाझामध्ये कार्यरत असलेला राजकीय आणि लष्करी गट ‘हमास’च्या मदतीवर ताबा घेत आहे, यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्र अन्नपुरवठ्यावर तात्पुरती बंदी घातली होती. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष रोखण्यासाठी काही देश मध्यस्थी करीत आहेत, त्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये युद्धविराम होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.