– अन्वय सावंत

भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने भारताने संघबांधणीला सुरुवात केली आहे. यंदाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रंगणार असून या स्पर्धेसाठी भारताने आता केवळ २० खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. या खेळाडूंना आलटूनपालटून संधी देण्याचा निर्णय रविवारी (१ जानेवारी) झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीत घेण्यात आला. मात्र, या खेळाडूंची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली. परंतु गेल्या काही काळात ज्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे, ते पाहता हे २० खेळाडू कोण असू शकतील याचा अंदाज बांधणे फारसे अवघड नाही.

‘बीसीसीआय’ने कोणत्या कारणास्तव बैठक बोलावली होती?

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यासाठी रविवारी ‘बीसीसीआय’ची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिकाही भारताने गमावली. या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या गेल्या वर्षातील कामगिरीसह या वर्षी मायदेशात होणारी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने काय निर्णय घेण्यात आला?

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आता केवळ २० खेळाडूंवर लक्ष केंद्रित करून त्यांनाच संधी देण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. तसेच एकदिवसीय विश्वचषकापूर्वी कोणत्याही प्रमुख खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी ‘आयपीएल’मधील दहाही संघांना भारतीय खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देण्याची सूचना ‘बीसीसीआय’कडून करण्यात येणार आहेत. ‘आयपीएल’ संघ राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) सोबत मिळून खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवतील.

२० खेळाडू कोण असू शकतात?

फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर

यष्टिरक्षक : केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन</p>

अष्टपैलू : हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर

फिरकीपटू : अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव

वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

अन्य कोणत्या खेळाडूंबाबत विचार केला जाऊ शकतो?

एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संभाव्य २० खेळाडूंची यादी तयार करण्यात आली असली, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अन्य खेळाडूंसाठीही भारतीय संघाची दारे खुली होऊ शकतील, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. या अन्य खेळाडूंमध्ये अनुभवी सलामीवीर शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन यांची नावे आघाडीवर आहेत. धवन गेले दशकभर भारतीय एकदिवसीय संघाचा प्रमुख सदस्य होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्याची कामगिरी खालावली. तसेच इशान किशन आणि शुभमन गिल यांसारख्या युवा सलामीवीरांनी चमक दाखवली. त्यामुळे धवनने एकदिवसीय संघातील स्थान गमावले. मात्र, देशांतर्गत स्पर्धा आणि ‘आयपीएल’मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास धवनचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. तसेच अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीपक हुडा, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा, शिवम मावी, आवेश खान, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्याबाबतही निवड समिती विचार करू शकेल.

हेही वाचा : विश्लेषण : टीम इंडियाचा ‘खेळ’ पाहून BCCI नं आणली Dexa Test; जाणून घ्या या टेस्टविषयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बीसीसीआय’च्या बैठकीत अन्य कोणते महत्त्वाचे निर्णय झाले?

रोहित शर्माने कर्णधार म्हणून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीबाबत ‘बीसीसीआय’चे प्रमुख पदाधिकारी समाधानी आहेत. त्यामुळे रोहितचे कर्णधारपद तूर्तास तरी धोक्यात नसल्याचे बैठकीनंतर ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय संघात निवडीसाठी यो-यो तंदुरुस्ती चाचणी आणि डेक्सा (हाडांची चाचणी) हेसुद्धा निकष असणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले. गेल्या काही वर्षांत देशातील उदयोन्मुख खेळाडू ‘आयपीएल’चा विचार करून केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धांत जास्तीत जास्त सामने खेळणे अनिवार्य असल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.