राज्यातील विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना ठाण्यात शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील वर्चस्ववादाची राजकारणाचे छुपे समर्थन लाभले होते का, याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाणे शहरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भगवा सप्ताह साजरा केला जात असून यानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून शहरात उद्धव आणि शिंदेसेनेकडून ‘पोस्टर वाॅर’ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. ‘पक्ष चोरणारे हिंदुत्ववादी कसे?’ इथपासून ‘दिल्लीपुढे घालीन लोंटागण वंदीन चरण कुणाचे?’ असा सवाल एकमेकांना करणारे पोस्टर दोन्ही बाजूंकडून उभारण्यात आले होते. उद्धव यांच्या सभेपूर्वी शहरातील राजकीय वातावरण असे तापले असताना राज ठाकरे यांच्या समर्थकांनी शेण, बांगड्या आणि नारळफेक करत या आगीत तेल ओतले. उद्धव यांचा ताफा ज्या भागातून येत होता त्या मार्गावर जागोजागी दबा धरून बसलेले मनसेचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक होत असताना ठाणे पोलिसांना या हल्ल्याचा सुगावा कसा लागला नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ठाण्यात मनसेची ताकद किती?

ठाण्यातील राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद फारशी नाही. या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाण्यात मनसेचे अस्तित्व काही प्रमाणात दिसून येत असले तरी निवडणुकीच्या राजकारणात या पक्षाला फारसे यश मिळत नाही असा इतिहास आहे. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राज यांना महाराष्ट्रात बऱ्यापैकी यश मिळाले. या पक्षाचे १३ आमदार निवडून आले. ठाण्याने मात्र मनसेला फारशी साथ दिली नाही. ठाणे महापालिकेत पक्षाचे सर्वाधिक सात नगरसेवक निवडून आले होते. या पक्षाचे शहरातील प्रभावी नेते अविनाश जाधव यांनाही निवडणुकीच्या राजकारणात अजूनही यश मिळालेले नाही. कल्याण, डोंबिवलीने पहिल्यापासून राज यांना बऱ्यापैकी साथ दिली आहे. सध्या या पक्षाचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडून येतात. ठाण्यात मात्र आक्रमक आंदोलनापलीकडे मनसेच्या हाताला फारसे काही लागलेले नाही. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव यांना ७० हजारांहून अधिक मतदान झाले खरे, मात्र त्यातही विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात तेव्हाच्या संघटित शिवसेनेने दिलेली साथ लपून राहिली नव्हती.

UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
car police viral video loksattA
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले
Thousands protested in Gondia on September 22 against attacks on women in Bangladesh
गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
jammu and kashmir 3 terrorists killed marathi news
बारामुल्ला येथे चकमक; तीन दहशतवादी ठार, निवडणुकीच्या तोंडावर घुसखोरीमध्ये वाढ

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चे सेबीच्या अध्यक्षांवर आरोप काय? या आरोपांमुळे खळबळ का उडाली?

मुख्यमंत्री आणि मनसेचे ठाण्यातील संबंध कसे?

शिवसेना एकसंध असताना एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मनसेला कधीच बाळसे धरू दिले नाही. २०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेला मनसेच्या सात नगरसेवकांची मदत हवी होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे आणि प्रताप सरनाईक या अन्य दोन आमदारांसह राज ठाकरे यांची तेव्हाच्या ‘कृष्णकुंज’ येथे भेट घेतली होती. या भेटीमुळे शिंदे यांनी तेव्हा उद्धव यांचा रोष ओढावून घेतल्याची चर्चा होती. हा एकमेव प्रसंग सोडला तर शिंदे यांनी कधीही मनसेला मदत होईल असे राजकारण ठाण्यात तरी केले नव्हते. मध्यंतरी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तेव्हाची संपूर्ण एकसंध शिवसेना जाधव यांच्यावर तूटुन पडल्याचे दिसले होते. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्याचे राजकारण बदलले. शिंदे मुख्यमंत्री झाले. तरीही जाधव यांच्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे समर्थकांमध्ये फारशी सहानुभूती नाही. असे असताना शनिवारी उद्धव यांच्यावर हल्ला होत असताना शिंदेसेनेतील काही पदाधिकाऱ्यांची मनसेला छुपी साथ लाभल्याची चर्चा मात्र जोरात आहे.

हेही वाचा >>>सुनीता विल्यम्स २०२५ पर्यंत अंतराळातच राहणार? कारण काय? अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाची योजना काय?

शिंदेसेनेने मनसेच्या माध्यमातून उद्धव यांना घेरले?

उद्धव यांच्या शनिवारच्या सभेनिमित्त त्यांच्या समर्थकांनी शहरभर फलक उभारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. ‘पक्ष चोरणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करावी का?’ असा सवाल करणारे फलक उद्धव समर्थकांनी जागोजागी उभारले होते. या फलकांना उत्तर म्हणून शिंदेसेनेनेही सत्तेसाठी उद्धव कसे दिल्लीपुढे झुकले अशा आशयाचे फलक उभारले होते. ही सभा शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुंकणारी ठरेल असेच एकंदर वातावरण असताना मनसैनिकांनी उद्धव यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याने सभेपूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघाले. उद्धव यांचा वाहनांचा ताफा ज्या मार्गावरून येत होता तेथे जागोजागी दबा धरून बसलेले मनसैनिक शेण, नारळ, टाॅमेटो, पाण्याच्या बाटल्या या ताफ्यावर फेकताना दिसले. इतके सगळे नियोजनबद्ध पद्धतीने होत असताना ठाणे पोलिसांना या हल्ल्याची कल्पना नसावी याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्धव यांची सभा संपताच मुख्यमंत्री शिंदे स्वत: टेंभी नाका येथे आले. तेथे त्यांनी उद्धव यांच्यासोबत असलेल्या आनंद दिघे यांच्या कडव्या समर्थक अनिता बिर्जे यांना पक्ष प्रवेश दिला. उद्धव यांची सभा, त्यापूर्वी त्यांच्या ताफ्यावर होणारा हल्ला, गोंधळलेले पोलीस आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारे पक्षप्रवेश या सर्व घडामोडींची आता राजकीय वर्तुळात जुळवाजुळव केली जात आहे. मनसैनिकांना मिळालेली मोकळी वाट हा ठरविलेल्या राजकीय व्यूहरचनेचा भाग होता का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.