scorecardresearch

विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?

ठाणे जिल्ह्यात काही शहरांचा अपवाद वगळला तर हवामानाचा अंदाज वर्तवणारी, एखाद्या बदलाचे विश्लेषण करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही.

विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?
लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या? (संग्रहीत छायाचित्र)

सागर नरेकर

गेल्या काही वर्षांत विशिष्ट क्षेत्रात तसेच जिल्हापरत्वे हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यात सातत्याने चाळीशीपार जाणारा पारा, आधी लांबणारी, मग कडाक्याची पडणारी थंडी आणि एखाद्या भागात धो-धो कोसळणारा पाऊस यांमुळे हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या यंत्रणांचे महत्त्व दिवसागणिक अधोरेखीत होताना दिसत आहे. एका विशिष्ट जिल्हा किंवा शहरात ढगफुटीसदृश पाऊस होऊन सर्व यंत्रणा कोलमडतात असा अनुभव आता ठाणे जिल्ह्यातही वरचेवर येऊ लागला आहे. असे असले तरी हवामानातील तंत्र अत्याधुनिक होऊनही या सर्व बदलांचा पूर्वअंदाज मिळत नाही अशी तक्रार सर्वदूर आहे. ठाणे जिल्ह्यात काही शहरांचा अपवाद वगळला तर हवामानाचा अंदाज वर्तवणारी, एखाद्या बदलाचे विश्लेषण करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही, अशा तक्रारी आता या क्षेत्रातील जाणकारांकडून सातत्याने केल्या जात आहेत. शासकीय यंत्रणांच्या या आघाडीवरील मर्यादा अगदी स्पष्टपणे जाणवत असल्या तरी समांतर पद्धतीने हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना राजाश्रय देऊन त्यांची मदत घेतल्यास त्याचा सरकारला फायदाच होऊ शकते असा एक मतप्रवाह आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशा खासगी अभ्यासकांचे प्रमाण आणि काम वाढल्याचे पहायला मिळते.

मुंबई महानगर क्षेत्र आणि राज्यात वेधशाळांची काय स्थिती आहे?

शासकीय वेधशाळा मर्यादित आहेत. मुंबईतील कुलाबा, कोकणातील काही ठिकाणी वेधशाळा आहेत. कृषी विद्यापीठ त्यांच्या स्तरावर हवामानाचा अंदाज घेत असतात. तालुका स्तरावर महसूल विभाग पावसाची नोंद करत असतो. तर पीक विमा कंपन्या खासगी कंपन्यांच्या मदतीने पाऊस आणि तापमानाची नोंद घेत असतात. त्याची विमा नुकसानभरपाई देण्यासाठी मदत होत असते. मात्र पूर्वसूचना मिळण्यााठी याचा कोणताही फायदा होत नाही. गेल्या काही वर्षात एका ठिकाणी, एका विशिष्ट शहरात किंवा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याची घटना दिसून आली आहे. त्यामुळे या वेधशाळांची स्थानिक पातळीवर गरज सातत्याने व्यक्त होत आहे. पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात या यंत्रणांवर निधी खर्च करायची आवश्यकताही व्यक्त होताना दिसते.

स्थानिक पातळ्यांवर वेधशाळांची गरज का आहे?

जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने जागतिक हवामान संघटनेने ‘अर्ली वॉर्निंग अँड अर्ली रिअॅक्शन’ ही संकल्पना घेऊन त्यावर काम करण्याचे ठरवले आहे. वातावरणातील बदल, हवामानाचा अंदाज यांची माहिती लवकर घेऊन त्यानुसार आपातकालीन परिस्थितीत काम करण्यासाठी वेळ मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. मात्र शासकीय हवामान वेधशाळांची संख्या मर्यादित आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये किंवा कोकण भागात ज्या शासकीय वेधशाळा आहेत.,त्या फक्त समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहेत. कुलाबा आणि सांताक्रुज येथील वेधशाळांमध्ये नोंद केले जाणारे तापमान आणि मुंबई महानगर क्षेत्रातील बदलापूरसारख्या शेवटच्या शहरामध्ये असलेल्या तापमानात अनेकदा तफावत असते. अंबरनाथ, बदलापूरच नव्हे, तर अगदी कल्याण, डोंबिवलीतील तापमानाची योग्य नोंद होत नाही अशा तक्रारी आहेत. त्यामुळे शासकीय वेधशाळांच्या अंदाज आणि नोंदींना मर्यादा आहेत.

विश्लेषण: गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस तक्रार प्राधिकरण देऊ शकते का? न्यायालय काय म्हणते?

सध्या ठाणे जिल्ह्यात हवामानाचा अंदाज देणारी आणि नोंद यंत्रणा आहे का?

ठाणे जिल्ह्यात शासकीय वेधशाळा नाहीत, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत खासगी हवामान अभ्यासकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोजक्याच वेधशाळांमुळे फक्त मर्यादित भागांच्या हवामानाचा अंदाज, तापमानाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. मात्र खासगी अभ्यासकांमुळे इत्थंभूत नोंदी आणि अंदाज संकलित होत आहेत. मात्र त्यांचा उपयोग शासन स्तरावर अजूनही करून घेतला जात नाही. याबाबत शासन स्तरावर असलेल्या अनास्थेमुळे शेती, आपातकालीन परिस्थितीत पूर्वसूचना मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाच्या निकषांवर हवामानाचा अभ्यास करणाऱ्या या अभ्यासकांना शासकीय मान्यतेसाठी आणखी किती काळ वाट पहावी लागणार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

खासगी वेधशाळा, अभ्यासकांना राजाश्रयाची गरज का आहे?

सध्याच्या घडीला खासगी हवामान अभ्यासकांमुळे ठाण्यासारख्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील इत्थंभूत माहिती मिळू लागली आहे. नुकतीच बदलापुरात दशकभरातील नीचांकी तापमानाची नोंद याच अभ्यासकांमुळे झाली. तर पावसाळ्याचे अंदाजही याच अभ्यासकांमुळे कळत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेले पावसाचे प्रमाण, अंदाज याची सविस्तर माहिती हे अभ्यासक त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे देण्याचा प्रयत्न करतात. ही माहिती किती अचूक याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असले तरी शासकीय यंत्रणांची मर्यादाही यानिमित्ताने दिसून येते. ठाणे जिल्ह्यात खासगी अभ्यासकांनी हवामानाचे वर्तविलेले काही अंदाज यापूर्वी योग्य ठरल्याचेही पाहायला मिळाले आहे.

२०१९ या वर्षात बदलापूरजवळ पुराच्या पाण्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. या भागात त्या दिवसात आणि शेजारच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण होईल, असा इशारा या खासगी हवामान अभ्यासकांनी दिला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गेल्या तीन वर्षांत कोकण क्षेत्रात प्रत्येक शहरनिहाय वाढलेल्या पावसाचे प्रमाण नोंदवले गेले आहे. मात्र या खासगी हवामान अभ्यासकांच्या नोंदीना अजून तरी शासन स्तरावर मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या नोंदी किंवा अंदाजाचा शासकीय वापर केला जात नाही. त्याचा वापर शासनाने केल्यास पूर नियंत्रण, नियोजनासाठी त्याचा फायदा होईल. शासनाला कमी पैशात यंत्रणा वापरण्यास मिळेल. त्यासाठीचा शासनाचा खर्चही वाचेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:00 IST

संबंधित बातम्या