scorecardresearch

विश्लेषण: ओझोनच्या थराची छिद्रं दुरूस्त होऊ लागल्याचा अर्थ काय?

ओझोनच्या थरांची दुरूस्ती ही एक महत्त्वाची घटना असल्याचं मत शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे

विश्लेषण: ओझोनच्या थराची छिद्रं दुरूस्त होऊ लागल्याचा अर्थ काय?
ओझोनच्या थराला पडलेली छिद्रं दुरूस्त होण्यास सुरूवात

पृथ्वीवर जे लोक राहतात त्यांच्यासाठी ओझोनच्या थराला पडलेली छिद्रं हा चिंतेचा आणि तेवढाच धोकादायक मानला जाणारा विषय होता. मात्र आता एका वैज्ञानिक अहवालानुसार २०६६ पर्यंत ही छिद्रं पूर्णपणे दुरूस्त होण्याची अपेक्षा आहे. खरंतर अंटार्टिकावर फक्त ओझोनचा थर आहे. तिथे सर्वात मोठं छिद्र आहे. ते भरून येण्यासाठी बराच वेळ लागेल. बाकी उर्वरित ठिकाणी जी छिद्र आहेत ती २०४० या वर्षापर्यंत भरून येतील. १९८० मध्ये जी स्थिती या थराची होती तशीच स्थिती २०४० मध्ये असेल अशी अपेक्षा आहे. असाही अहवाल UN समर्थित संशोधकांच्या पॅनलने दिला आहे.

ओझोनचा थर नेमका काय आहे?

ओझोन वायूचा थर हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करणारा थर आहे. रंगहीन असलेला हा वायू ऑक्सिजनच्या विशिष्ट रेणूंपासून बनलेला आहे. १९८५ मध्ये दक्षिण ध्रुवावर ओझोनच्या थराला मोठं छिद्र पडल्याचं निरीक्षणावरून पुढे आलं होतं. १९९० च्या दशकात या थरात १० टक्के घट झाल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

१९८९ मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्यात आली ज्यामुळे ओझोनच्या थराची दुरूस्ती करण्याच्या प्रयोगाला य़श आलं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने बंदी घातलेले ९९ टक्के पदार्थ वापरातून काढण्यात आल्याने हे शक्य झालं. त्यामुळे ओझोनचा थर आता पूर्ववत होऊ लागल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.

ओझोनच्या थरात बिघाड कसा झाला?

१९८० च्या दशकाच्या सुरूवातीला ओझोनच्या थराचा ऱ्हास होणं पर्यावरणाच्या दृष्टीनो धोक्याची घंटा मानलं गेलं. ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० ते ५० किमी अंतरावर स्ट्रॅटोस्फियर नावाच्या भागात आढळतो.

ओझोनचं छिद्र म्हणजे काय?

ओझोनच्या थरात छिद्र दिसण्याचा अर्थ ओझोनच्या रेणूंच्या एकाग्रेत झालेली घट आहे. अगदी सामान्य स्थितीत ओझोन स्ट्रॅटोस्फियरमध्ये अत्यंत कमी एकाग्रतेत असतो. १९८० च्या दशकात संशोधकांना याच एकाग्रतेत तीव्र घट दिसू लागली. दक्षिण ध्रुवावर ती जास्त स्पष्टपणे दिसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. अंटार्टिकावरून दिसणारे ओझोनचे मोठे छिद्र सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिसलं होतं. १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत या घटनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी हे शोधलं होतं की ओझोनचा थर कमी होण्याचं किंवा त्याला छिद्र पडण्याचं कारण हे प्रामुख्याने क्लोरीन, ब्रोमी आणि फ्लोरीन असलेल्या औद्योगिक रसायनाच्या वापरामुळे होतं. क्लोरोफ्लोरो कार्बन्स म्हणजे जे फ्रिज किंवा पेंट्स किंवा फर्निचर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते त्याचा परिणाम या ओझोनच्या थरावर होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं होतं.

परिस्थितीत सुधारणा कशी झाली?

मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या अमलबजावणीमुले ओझोन थराच्या छिद्रात २००० सालापासून सातत्याने सुधारणा होते आहे. सध्याच्या निरीक्षणानुसार आत्ताही धोरणंही तशीच राहिली तर अंटार्टिकावर २०६६ पर्यंत आर्टिकावर २०४५ पर्यंत आणि उर्वरित जगासाठी २०४० पर्यंत ओझोन थर जसा १९८० च्या दशकात होता तसाच म्हणजेच पूर्ववत होईल. असं झाल्यास हवामानाच्या दृष्टीने काही बदल नक्की पाहण्यास मिळतील. मात्र ते बदल सुसह्य असतील असंही मत काही संशोधकांनी नोंदवलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 21:53 IST

संबंधित बातम्या