देशभरात लैंगिक अत्याचाराच्या, सामूहिक बलात्काराच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात. यापैकी काही गुन्हे हे सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेले असतात. पण, नेमकं यामागे गुन्हेगाराची किंवा अत्याचार करणाऱ्याची मानसिकता काय असेल याचं अचूक कारण शोधणं मात्र पोलिसांसाठी अवघड होऊन जातं. मग तज्ज्ञांच्या साहाय्याने विविध प्रकारच्या टेस्ट आरोपींवर केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच मुंबईत दादरसारख्या सुशिक्षित, उच्चभ्रू परिसरात एक ४० वर्षीय शिक्षिका १६ वर्षांच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. केवळ एकदा दोनदा नाही तर वर्षभर ही शिक्षिका या मुलावर अत्याचार करत होती. अशा गुन्ह्यांमागे नेमकी काय मानसिकता असावी हे ओळखणं कठीणच आहे. मात्र, पोलिसांकडून अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये काही मानसिक चाचण्याच केल्या जातात.
या प्रकरणातील शिक्षिकेची गुरुवारी मानसिक चाचणी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला तिच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. त्यानंतर गुरुवारी तिची चाचणी करण्यात आली. या शिक्षिकेवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मानसोपचार चाचणी कशासाठी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी शिक्षिकेच्या मानसिक आरोग्याची स्थिती लक्षात घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पोलिस कोठडीत असताना त्यांच्यावर मानसिक चाचण्या केल्या जातात. शिवाय वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीतच त्या केल्या जातात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या गुन्ह्याच्या वेळी आरोपी मानसिकदृष्ट्या स्थिर होता की नाही हे तपासण्यासाठी पोलिस अनेकदा मानसोपचार चाचण्या घेतात.
आरोपींच्या मानसिक स्थितीबद्दल कायदा काय सांगतो?
पोक्सो कायद्याच्या कलम ३० मध्ये दोषी मानसिक स्थितीचा अंदाज म्हणजेच हेतू, एखाद्या वस्तुस्थितीचे ज्ञान आणि त्या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे किंवा त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण सांगणे केले आहे. ही चाचणी मानसिक स्थिती तपासण्याच्या पद्धतीने असली तरी कलम असं सांगतात की, आरोपी व्यवस्थित मानसिक स्थितीत होता किंवा गुन्हा करण्याचा त्याचा हेतू होता. हा कायदा आरोपीवर हे सिद्ध करण्याची जबाबदारी टाकतो की गुन्हा करण्याचा कोणताही लैंगिक हेतू किंवा मानसिक स्थिती नव्हती.
हे फौजदारी कायद्यातील मूलभूत तर्कांच्या विरुद्ध आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, एखाद्या विशिष्ट गुन्ह्यात दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असते. कायद्यानुसार, तपास संस्थेवर किंवा फिर्यादीवर न्यायालयासमोर पुरावा सादर करून त्या व्यक्तीचा गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्याची जबाबदारी असते.
ठळक मुद्दे:
- ४० वर्षीय शिक्षिकेचा १६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार
- मुंबईतल्या दादरमधील घटना
- २०२३ मध्ये एका कार्यक्रमात झाली होती ओळख
- २०२४पासून मुलावर लैंगिक अत्याचार करत होती
- ही शिक्षिका विवाहित असून तिला एक मुलगाही आहे
- पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
कायदेशीरतज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की, पोक्सो कायदा मुलांशी संबंधित असल्याने अत्याचार करणाऱ्याचा हेतू समजून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकणे आव्हानात्मक असू शकते, त्यामुळेच आरोपीच्या हेतूची किंवा मानसिक स्थितीतील दोषारोप गृहीत धरणे या कायद्यांतर्गत पीडितांच्या बाजूने आहे.
असं असताना, याचा अर्थ असा नाही की आरोपीला केवळ गृहीत धरून दोषी ठरवता येते. जेव्हा फिर्यादीकडे ठोस पुरावे असतात, तेव्हा आरोपीवर उलट त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी असते. म्हणजेच जर एखाद्या मुलाने अशी साक्ष दिली की, एखाद्या व्यक्तीने लैंगिक हेतूने अयोग्यरित्या स्पर्श केला, तर जोपर्यंत आरोपी सिद्ध करणारे पुरावे दाखवू शकत नाही तोपर्यंत न्यायालय हेच गृहीत धरते.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्याचा छळ करीत होती, त्यामुळे तो तणावाखाली होता. शाळेत इंग्रजी विषय शिकवणारी आरोपी शिक्षिका विवाहित असून तिला एका मुलगा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. जानेवारी २०२४ मध्ये तिने पहिल्यांदा अत्याचार केला. विद्यार्थ्याने सुरुवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला, पण ही शिक्षिका मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होती, त्यामुळे तो तणावाखाली होता. आरोपी महिलेने त्याला मोटरगाडीतही बसवून दादर पोलिसांच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी महिलेने नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी औषधाच्या गोळ्याही खाण्यासाठी दिल्या होत्या, असा आरोप आहे. तसेच महिलेने मुलाला पंचतारांकीत हॉटेलमध्येही नेले होते, त्यामुळे मुलगा नैराश्यात गेला होता. या प्रकरणात शिक्षिकेला मदत करणारी महिला डॉक्टर गेल्यावर्षी दिवाळीमध्ये युकेला गेली होती, तेव्हापासून ती तेथेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुलाने फेब्रुवारी महिन्यात शिक्षिकेशी संपर्क तोडला होता. त्याने तिचा मोबाइल ब्लॉक केला होता. त्याने एकदा भेटावे यासाठी शिक्षिकेने तिच्या घरी कामात मदत करणाऱ्या महिलेला मुलाच्या घरी पाठवले. मॅडमचे पैसे घेतलेत ते द्यायला मॅडमना भेटायला ये, असे खोटे सांगून महिलेने शिक्षिकेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी ही शिक्षिका मुलाला प्रमाणाबाहेर त्रास देत असल्याचा संशय आल्याने पीडित मुलाच्या घरच्यांनी त्याला विश्वासात घेऊन या संदर्भात विचारले. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. दरम्यान, आरोपी महिलेने चौकशीत मुलावरील प्रेमापोटी सर्व केल्याचे सांगितले