सिंदूर मोहिमेत भारतीय सैन्यदलांच्या नियोजनबद्ध कारवाईने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेला तडाखा दिला. या हल्ल्यात अमेरिकन बनावटीचे एफ – १६ आणि चिनी जेएफ – १७ यासह अन्य विमाने, ड्रोन अल्पावधीत नष्ट केली. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्यदलाचा संभाव्य प्रतिकार रोखण्यासाठी सर्व पातळीवर पूर्वतयारीने सज्जता राखली गेली. धोरणात्मक बदल करून निर्णायक लष्करी कारवाईने भारताने प्रादेशिक शक्ती म्हणून पुन्हा आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

उद्देश आणि साध्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे आणि पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेला धक्का देणे हे ध्येय समोर ठेवत सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर दिले. सुरुवातीच्या कारवाईचे पुनर्विलोकन करीत भारतीय सैन्यदलांनी रणनीतीत वेगाने बदल केले. पाकिस्तानकडील चिनी हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ करीत हवाई हल्ल्यांचा मार्ग निर्धोक केला. पाकिस्तानच्या धोरणात्मक हवाई तळांवर युक्तीने अचूक हल्ले चढविले गेले. त्याचे मुख्य कमांड सेंटरही नष्ट केले. ८८ तासांत पाकिस्तानच्या हवाई क्षमतेला मोठा धक्का दिला.

अचूक लक्ष्य निश्चिती

युद्धात शत्रूचे अधिकतम नुकसान करण्यासाठी अचूक लक्ष्यनिश्चिती महत्त्वाची ठरते. याचा लष्करी आणि मानसिक प्रभाव पडतो. या कारवाईत भारतीय सैन्यदलाने ते दाखवून दिले. सामरिक विमान वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नूर खान (चकलाला) हवाई तळावर ब्राम्होस क्षेपणास्त्राने हल्ला केला. यात पाकिस्तानच्या सी १३० हरक्युलस विमानाचे नुकसान झालेच, शिवाय काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या आपत्कालीन रसद पुरवठा व्यवस्थेवर हा प्रहार होता. इस्लामाबादलगतच्या नूरखान तळावरील हल्ल्याचे प्रतीकात्मक मूल्य अधिक होते. सिंध प्रांतातील भोलारी तळावरील हल्ल्यात झेडडीके – ०३ .काराकोरम ईगल हे हवाई पाळत ठेवणारे विमान नष्ट करण्यात आले. परिणामी, ७२ तास पाकिस्तान त्याच्या दक्षिण आणि पूर्वेकडील हवाई क्षेत्रात अधांतरी राहिला. त्याला लागलीच विमान हल्ल्याचे नियोजन व प्रतिबंधात्मक प्रतिसाद देण्यावर मर्यादा आली.

सरगोधा हवाई तळ म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाच्या मध्यवर्ती कमांडचे मुख्यालय आहे. भारतीय क्षेपणास्त्राने एक एफ – १६ विमान नष्ट झाले. तर, काहींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तळाच्या धावपट्टीवर खड्डे पडल्याने ४८ तास हवाई सेवा बंद पडली. जकोबाबाद तळावर भारतीय ड्रोनच्या हल्ल्यांनी भारतीय कारवाईवर लक्ष ठेवण्याची त्याची क्षमता विस्कळीत झाली. सुक्कुर तळावर मार्गदर्शित बॉम्ब हल्ल्यांनी त्याची पुरवठा साखळी तोडण्यात आली. रहिमयार खान तळावर हल्ल्यात दारूगोळ्याचे नुकसान, दोन मिराज विमाने नष्ट करण्यात आली. शाहजाब तळावरील हल्ल्याचे युक्तीने नियोजन झाले. ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या तोफखान्याने स्थानिक प्रणाली नष्ट केल्या. पाकिस्तानी रडार यंत्रणांचे लक्ष विचलित करण्यात आले.

सैद्धांतिक बदल

सिंदूर मोहिमेत पाकिस्तानवर हवाई तळ केंद्रित हल्ले प्रत्युत्तरात्मक कारवाई नव्हती, तर ते उच्च दर्जाचे लष्करी नियोजन होते. प्रत्येक तळाची निवड त्याची हवाई संरक्षण रचनेतील भूमिका लक्षात घेऊन करण्यात आली. २२ मिनिटांत १० हवाई तळांवर हल्ल्यांची रचना पाकिस्तानी हवाई दलास अधू करण्याच्या दृष्टीने केलेली होती, ज्यामुळे त्याला मूल्यमापन वा प्रतिसादही देता येणार नाही, याची दक्षता घेतली गेली. नूरखान, भोलारी आणि सरगोधा हे हवाई तळ काही कालावधीसाठी तटस्थ ठेवल्याने पाकिस्तानी हवाई दलाचा समन्वय कोलमडला. सिंदूर मोहिमेत भारतीय हवाई दलाने पारंपरिक हवाई शक्तीच्या सिद्धांताचे स्वप्न जे क्वचितच अमलात आणले जाते, ते प्रत्यक्षात आणले.

क्षेपणास्त्र संरक्षण कवच प्रणाली

संभाव्य प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांचा अंदाज बांधून भारती सैन्यदलाने आपल्या प्रदेशाच्या संरक्षणार्थ बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केली. एस – ४०० अर्थात सुदर्शन चक्र प्रणालीने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या धोक्यांना रोखले. जोडीला स्वदेशी आकाश प्रणालीने कमी उंचीवरील धोक्यांना निष्प्रभ केले. यात मुख्यत्वे पाकिस्तानी ड्रोनचा समावेश होता. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (स्मार) क्षेपणास्त्र प्रणालीने लष्करी व नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळता आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवाई सिद्धांताची तुलना

सिंदूर मोहिमेत भारताच्या धोरणात्मक बदलाकडे लक्ष वेधत लष्करी तज्ज्ञांकडून हवाई सिद्धांताची तुलना केली जात आहे. या मोहिमेत भारतीय सैन्यदलाच्या वेगवान व निर्णायक कारवाईने पाकिस्तानी सैन्यदलाचे मनोधैर्य खच्ची झाले. आणि ८८ तासांच्या आत त्यांना युद्धबंदीची मागणी करण्यास भाग पडले. धोरणात्मक उद्दिष्ट्ये साध्य करण्यात मोहिमेचा प्रभाव अधोरेखित झाला. सिंदूर मोहीम भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात पूर्व प्रतिरोधकता आणि अचूक युद्धाकडे बदल दर्शवते. याउलट नाटो सिद्धांत संपर्ककेंद्रीत युद्धावर भर देतो. इस्रायलचा पूर्व प्रतिरोधक सिद्धांत सिंदूर मोहिमेच्या अकस्मात, अचूक हल्ल्याशी मेळ साधणारा आहे. चीन धोरणात्मक खोली आणि हवाई क्षेत्र नाकारण्याच्या सिद्धांताचे पालन करतो. तर अमेरिका पूर्णत: वर्चस्व, उपग्रह, बहुविध क्षेत्राच्या एकत्रीकरणावर लक्ष केंद्रीत करतो. भारताचा हवाई संरक्षण प्रणाली व ड्रोनच्या नेतृत्वाखालील दृष्टिकोन जागतिक स्तरावर सर्वात आधुनिक सिद्धांताच्या समीप जाणारा असल्याचा मुद्दा तज्ज्ञांकडून मांडला जातो.