केंद्र सरकारकडून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावित पाच प्रकल्पांपैकी दोन मार्गिकांच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. या विस्तारित मार्गिका प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे पुणे शहरातील पूर्व-पश्चिम भागातील प्रवास आणखी सुकर होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मेट्रोबाबत सद्यःस्थिती काय?

महामेट्रोने २०१४ मध्ये मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली. पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गामुळे मध्यवर्ती पेठांपासून शिवाजीनगर, सांगवी, दापोडी, खडकी परिसर; तर वनाज ते रामवाडी प्रकल्पामुळे कोथरूड, कर्वेनगर, वनाज, एरंडवणे, डेक्कन, कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगर या परिसरातील प्रवाशांना फायदा होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठा, सरकारी कार्यालये आणि रुग्णालये, एसटी महामंडळाची मोठी बस स्थानके असल्याने शिवाजीनगर ते मंडई-स्वारगेट या मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढली आहे.

अपेक्षित प्रवासीसंख्या गाठली गेली का?

सन २०१४ मध्ये केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) पीसीएमसी-स्वारगेट मार्गावर २०१८ मध्ये ३.८२ लाख, तर २०२१ पर्यंत ३.९७ लाख, तर वनाज-रामवाडी मार्गावर २०१८ मध्ये १.८९ लाख आणि २०२१ पर्यंत २.१२ लाख प्रवासी संख्येचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, प्रत्यक्षात २०२४ मध्ये प्रवाशांची दैनंदिन संख्या १.५५ लाख होती. अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी आहे. मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी बसच्या पूरक सेवा नसल्याने आणि स्थानकांजवळ वाहनतळ नसल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

विस्तारित मार्गाचा फायदा कोणाला होईल?

केंद्र सरकारने मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गिकांच्या विस्ताराला शहराच्या पूर्व-दक्षिण भागादरम्यानचे अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मंजुरी दिली. सद्य:स्थितीत रामवाडीपर्यंतच मार्गिका असल्याने तेथून पुढे पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, माॅल्स, छाेट्या मोठ्या कंपन्यांची कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गिका फायदेशीर ठरणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापासून रुबी हाॅल, येरवडा, रामवाडीपर्यंत दुहेरी रस्ता असतानाही प्रचंड वाहतूक कोंडी असते. हवाई प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे विमानतळ परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. हवाई प्रवाशांबरोबरच चंदननगर, खराडी, वाघोली या भागांतील नागरिकांना या मार्गिका उपयुक्त ठरणार आहेत. वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तारामुळे पौड रस्ता, कुंबरे पार्क, बावधन, एनडीए परिसरातील नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्ग येथून जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही या मार्गिकेचा फायदा होणार आहे.

मार्गिकांचा विस्तार कसा होणार?

वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या १.२ किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक अशी दोन स्थानके प्रस्तावित आहे, तर रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) मार्गिका १२.७५ किलोमीटर असून, त्यामध्ये विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी अशी १३ स्थानके नव्याने जोडली जाणार आहेत. या मार्गिकांच्या विस्तारासाठी महामेट्रोकडून अंदाजे ३६२४.२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन्ही उन्नत प्रकल्प असले, तरी भूसंपादन आणि इतर प्रक्रियांबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर महामेट्रोकडून निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्यात येईल. रामवाडी ते वाघोली या कामाला त्वरित सुरुवात करण्यात येणार असून, चार वर्षांत दोन्ही मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

मेट्रो विस्तार ही शहराच्या दृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे. मात्र, विस्तार करताना जुन्या मेट्रो स्थानकांपर्यंत जाण्यासाठीचे पदपथ, वाहनतळ आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना स्थानकांपर्यंत येण्यासाठी पूरक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महामेट्रो, दोन्ही महापालिका, वाहतूक पोलीस, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल), उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक अभ्यास करून मार्गांचा विस्तार करणे अपेक्षित आहे, तरच भविष्यात हे मार्ग फायदेशीर ठरतील, असे मत परिसर संस्थेचे प्रशांत इनामदार नोंदवितात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vinay.puranik@expressindia.com