scorecardresearch

Premium

विश्लेषण: ‘एआय’चा वापर चक्क हत्तींच्या सुरक्षिततेसाठी? काय आहे भारतीय रेल्वेची योजना?

सध्या अनेक क्षेत्रांत कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) शिरकाव होऊ लागला आहे. एआयमुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही नेहमी कानावर पडत आहे. यातच एआयच्या वापरामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे गजराज यंत्रणा.

Use of AI for the safety of elephants What is the plan of Indian Railways
हत्तींच्या नैसर्गिक अधिवासातून गेलेल्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)

संजय जाधव

सध्या अनेक क्षेत्रांत कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) शिरकाव होऊ लागला आहे. एआयमुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही नेहमी कानावर पडत आहे. यातच एआयच्या वापरामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे गजराज यंत्रणा. भारतीय रेल्वेकडून ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे लोहमार्ग ओलांडणाऱ्या हत्तींचा मृत्यू रोखला जाईल. भारत हा आशियाई हत्तींचे मूळ निवासस्थान मानला जातो. एकूण आशियाई हत्तींपैकी सुमारे ५० टक्के भारतात आहेत. देशात ३२ हत्ती अभयारण्ये असूनही त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. याला अवैध शिकारीसोबतच हत्तींच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. सध्या जंगलातून जाणाऱ्या सातशे किलोमीटर लांबीच्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. काय आहे नेमकी गजराज यंत्रणा?

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
green revolution in india
UPSC-MPSC : हरित क्रांतीनंतर शेती उद्योगामध्ये खतांच्या वापराबाबत असंतुलन का निर्माण झाले? यासंदर्भात कोणत्या सुधारणा करणे गरजेचे आहे?
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
china taiwan dispute marathi news, china taiwan marathi news, china taiwan war marathi news
चीन- तैवान वाद वाढणे जगासाठी चिंताजनक आहे, कारण…

आतापर्यंत किती हत्तींचे मृत्यू?

देशभरात डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पाच वर्षांत ४९४ हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यातील प्रमुख कारणे रेल्वे अपघात, विजेचा धक्का, शिकारी आणि विषबाधा ही आहेत. सर्वाधिक मृत्यू होण्याचे कारण वीजप्रवाहित तारांना स्पर्श होणे हे असून, त्यामुळे पाच वर्षांत तब्बल ३४८ हत्तींचा त्यामुळे मृत्यू झाला. त्याखालोखाल रेल्वे अपघातात ८०, तर शिकारीमुळे ४१ आणि विषबाधेमुळे २५ हत्तींचा मृत्यू झाला आहे. देशातील हत्तींपैकी ३० टक्के रानटी हत्ती दाट जंगलात राहतात, तर मानवी हस्तक्षेपामुळे विरळ झालेल्या जंगलात उरलेले हत्ती राहतात. त्यामुळे मागील काही काळात हत्ती आणि मानव असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला.

आणखी वाचा-विश्लेषण: व्हेनेझुएला-गयानातील वादाचे कारण काय? भारतावर कोणता परिणाम?

गजराज यंत्रणेची गरज का?

हत्तींचे सर्वाधिक मृत्यू वीजवाहक तारांना स्पर्श झाल्यामुळे होतात. जंगलाशेजारील भागांमध्ये शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी तारेच्या कुपंणातून वीजप्रवाह सोडतात. त्यामुळेही हत्तींचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल रेल्वेची धडक होऊन हत्तींचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेक जंगलांमधून लोहमार्ग गेले असून, ते हत्तींच्या नैसर्गिक मार्गांमधून गेलेले आहेत. त्यामुळे हत्ती त्यांच्या नैसर्गिक मार्गांनी जाताना लोहमार्ग ओलांडतात. यामुळे अनेक वेळा रेल्वे अपघात घडत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, देशात रेल्वेची धडक बसून दर वर्षी सरासरी २० हत्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासातून गेलेल्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

यंत्रणा कशी चालते?

एआय आणि ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करून संगणक प्रणाली लोहमार्गांवरील दोनशे मीटरच्या अंतरातील संशयास्पद हालचाल शोधते. हत्तीने लोहमार्गावर पाऊल ठेवताच कंपने तयार होतात. ही कंपने सेन्सरपर्यंत पोहोचतात. त्यातून ऑप्टिकल केबल फायबरच्या ऑप्टिकल सिग्नलमध्ये बदल होतात. त्यातून पुढे लोहमार्गावर धोका असल्याचा संदेश मिळतो. ऑप्टिकल फायबर केबलच्या पाच मीटरपर्यंतच्या अंतरातील हालचाल यंत्रणा टिपते. सिग्नलमधून पुढे लोहमार्गावर सुरू असलेली हालचाल कळण्यासोबत लोहमार्गावर हत्ती आहे की दुसरा प्राणी अथवा मानव याचीही कल्पना मिळते. संगणकीय प्रणालीमुळे प्राण्यांची हालचालच नव्हे, तर किती प्राणी त्या ठिकाणी आहेत, हेही कळते. ही यंत्रणा रेल्वेचा चालक, नियंत्रण कक्ष आणि स्थानक प्रमुखाला याबाबत इशारा देते.

आणखी वाचा-विश्लेषण : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईस विलंब का?

यंत्रणेची आधी चाचणी कुठे?

गजराज यंत्रणा ही काही नवउद्यमी कंपन्यांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. तिचा वापर पहिल्यांदा आसाममध्ये प्रायोगिक तत्त्वावर केला गेला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आसाममध्ये दीडशे किलोमीटर लांबीच्या लोहमार्गांवर तिचा वापर करण्यात आला. तिला चांगले यश मिळाले. या यंत्रणेच्या चाचणीत काही बाबी समोर आली. त्यानुसार तिच्यात काही सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता तिची अचूकता ९९.५ टक्के झाली आहे. याचबरोबर आसाममध्ये या यंत्रणेमुळे अनेक हत्तींचे प्राण वाचले आहेत.

भविष्यात नियोजन काय?

आसाममध्ये गजराज यंत्रणेकडून डिसेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत नऊ हजार ७६८ इशारे देण्यात आले. दिवसाला सुमारे ४१ इशारे रेल्वेला मिळाले. आसाममध्ये हत्तींच्या नैसर्गिक ११ अधिवासातून गेलेल्या लोहमार्गावरून बसविलेल्या या यंत्रणेमुळे एकाही हत्तीचा अपघात नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वेने आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ, झारखंड ही राज्ये आणि छत्तीसगड व तमिळनाडूतील काही भागांमध्ये जंगलातील लोहमार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. पुढील आठ महिन्यांत ती बसविली जाणार असून, त्यासाठी सुमारे १८१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आगामी काळात या यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी वन विभागाशी रेल्वे मंत्रालयाची चर्चा सुरू आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use of ai for the safety of elephants what is the plan of indian railways print exp mrj

First published on: 11-12-2023 at 09:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×