China Demands for Donkeys from Pakistan: कराचीमधील गाडागाडी चालवणारा अब्दुल रशीद याचे भवितव्य आता अनिश्चिततेने भरलेले आहे. त्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेलं टायगर नावाचं गाढव अलीकडेच एका अपघातात मृत्यूमुखी पडलं. त्यामुळे अब्दुलकडे आता उपजीविकेसाठी इतर कोणतेही साधन नाही.
पाकिस्तानमध्ये गाढवांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे नवे गाढव विकत घ्यावे की, नाही या संभ्रमात तो आहे. ‘सध्या पाकिस्तानमध्ये एक गाढव २ लाख रुपयांना आहे. मी ज्यावेळी टायगरला विकत घेतले त्यावेळी किंमत ३० हजार इतकी होती.’ रशीद सांगतो.
ही फक्त एकट्या रशिदची कहाणी नाही. रोजच्या उदरनिर्वाहासाठी गाढवांवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाची आहे. चीनमधील अब्जावधी डॉलर्सच्या ई-जियाओ व्यवसायामुळे गाढवाच्या कातड्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य गाढवं खरेदी करणाऱ्यांची स्पर्धा आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी आहे.
चीनला गाढवांची इतकी मागणी का आहे?
ई-जियाओ (Ejiao) हे गाढवाच्या कातड्याला उकळून तयार केलेले जिलेटिन आहे. ते पारंपरिक चिनी औषधांमध्ये वापरले जाते. याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. थकवा कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ट्युमरवर नियंत्रण ठेवणे आणि अशक्तपणावर दिलासा इत्यादी ई-जियाओचे औषधी गुणधर्म आहे.
“चीनमधल्या वाढत्या मागणीमुळे गाढवाचे कातडे आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग झाले आहे. ई-जियाओची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानमधील गाढवांना असलेली मागणी आणखी वाढेल,” असे कराचीतील पू-शेंग मेडिकल सेंटर चालवणारे डॉ. प्रा. गुओ जिंग फेंग यांनी सांगितले.
रशीदने सांगितले की, पाकिस्तानमधील सर्वात मोठा गाढव बाजार लियारी मध्ये आहे, तिथेही स्वस्त आणि निरोगी गाढव किमान १,५५,००० रुपयांना आहे. “मी एवढे पैसे कुठून आणू? आणि जरी काही करून हे पैसे उभे केले तरी, त्या गाढवाचे पैसे वसूल होण्याआधी… त्या गाढवाला काही होणार तर नाही ना, याची खात्री कोण देणार?” असे तो व्यथित होऊन म्हणतो. रशीदचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
गाढवं म्हणजे पाकिस्तानची संपत्ती
- पाकिस्तानमधील वाहतूक, शेती, पुनर्वापर, धुलाई आणि विशेषतः वीटभट्ट्यांमधील बांधकाम क्षेत्रात गाढवांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे.
- दररोज कष्ट करणारे बहुतांश मजूर गाढव गाड्यांद्वारे जड सामान वाहून रोज १,५०० ते २,००० रुपये कमावतात. त्यापैकी निम्मे पैसे गाढवाची देखभाल करण्यासाठी वापरले जातात. “हेच आमचं किमान साधन आहे आणि याच्यावरच घर टिकून आहे,” असं कराचीतील रहिवासी समदने सांगितलं.
- सुदान आणि इथिओपियानंतर पाकिस्तान सध्या जगात गाढवांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार गेल्या वर्षी देशात १,०९,००० नवीन गाढवांची भर पडली. त्यामुळे सध्या अंदाजे ५.९ दशलक्ष गाढवं पाकिस्तानमध्ये आहे. जगभरात सुमारे ५० कोटी गरीब लोक गाढव, घोडे आणि खच्चर यांसारख्या प्राण्यांवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.
प्रस्ताव, निदर्शने आणि नैतिक चिंता
- २०२५ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व संशोधन मंत्री राणा तनवीर हुसेन यांनी चीनच्या एका शिष्टमंडळाची बैठक घेतली. या शिष्टमंडळाने पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ करण्यात स्वारस्य दाखवले आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही योजना स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. यामुळे (खुराक, व्यवस्थापन, प्राण्यांची निगा राखणे) रोजगारनिर्मिती होऊ शकते.
- “गाढवाचे मांस आमच्यासाठी हराम आहे आणि त्याची व्यावसायिक, बेकायदेशीर आणि अनैतिक विक्री होणार नाही यासाठी ठोस पद्धत असावी. गाढवांची कातडी व मांसासाठी विशेष कारखाने असावेत. तिथेच वध व इतर प्रक्रिया केली जावी आणि ही उत्पादने स्थानिक बाजारात पोहोचू नयेत,” असे सलिम रेजा, कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे वरिष्ठ अधिकारी, यांनी स्पष्ट केले.
- परंतु, या व्यापाराचे धार्मिक व नैतिक परिणाम चिंतेचा विषय ठरत आहेत. रेजा यांनी भर दिला की, “सरकारने हे निश्चित करायला हवे की, चीनला गाढवांची गरज असली तरी त्यांचा वध पाकिस्तानमध्ये न होता थेट चीनला निर्यात होऊन तिथेच होणे आवश्यक आहे.”
- खैबर पख्तूनख्वा पशुधन व दुग्धविकास विभागाचे संचालक डॉ. असल खान यांनी मान्य केले की, काही खाजगी चिनी कंपन्यांनी गाढव व्यापारात रस दाखवला आहे. परंतु, त्यांनी स्पष्ट केले की, “हे प्रस्ताव केवळ खाजगी कंपन्यांकडून आले होते आणि ते प्रत्यक्षात आले नाहीत. त्यांचा एकमेव हेतू म्हणजे इथून गाढवं विकत घेऊन फक्त कातड्यासाठी चीनमध्ये घेऊन जाणे हा होता आणि आम्ही असा व्यवहार होऊ देत नाही.”
- सरकार प्रयत्न करत असले तरीही, काही चिनी खरेदीदार कोणत्याही अवस्थेतील गाढवं खरेदी करत आहेत. “एकदा एका चिनी गटाने १४ बारीक व अशक्त गाढवं ₹४०,००० प्रत्येकी दराने विकत घेतली होती,” अशी आठवण लियारीतील गाढव व्यापारी झोहेब शाह यांनी सांगितली. दरम्यान, चीनच्या इजियाओ बाजारात अलीकडील वर्षांत उत्पादनात १६०% वाढ झाली आहे आणि त्यामुळे गाढव कातड्यांचा बाजारही वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका पाकिस्तानमधील आधीच असुरक्षित मजूर वर्गाला बसण्याची शक्यता अधिक आहे.