scorecardresearch

विश्लेषण: शवविच्छेदन अहवाल गुन्ह्यांच्या तपासांमध्ये महत्त्वाचा का असतो?

शवविच्छेदन अहवाल का महत्त्वाचा असतो? कसं केलं जातं शवविच्छेदन? वाचा सविस्तर बातमी

विश्लेषण: शवविच्छेदन अहवाल गुन्ह्यांच्या तपासांमध्ये महत्त्वाचा का असतो?
काय आहे शवविच्छेदनाचे नियम?

सोनाली फोगाटच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे आफताबने करवतीने तुकडे केले, तुनिषाने फाशी घेऊन आयुष्य संपवलं, कंझावाला अपघातात अंजलीच्या शरीरातल्या ३६ जागी ४० गंभीर जखमा होत्या. या सगळ्या गोष्टी कशा समोर आल्या? हा सगळा खुलासा कुणी केला? तर याचं उत्तर पोस्टमॉर्टेम अहवाल अर्थात शवविच्छेदन अहवाल. कुठलंही प्रकरण असो, अपघात झाला असो, हत्या झाली असो, एखाद्याला विष देऊन मारलेलं असो प्रत्येक पैलू उलगडतो तो शवविच्छेदन अहवाल. गुन्हे घडल्यानंतर हा शब्द अनेकदा येतो.

मेडिकल सायन्समध्ये शवविच्छेदन अहवालाविषयी अनेक भलेमोठे लेख लिहिले गेले आहेत. गुगलवर अनेक बोजड भाषेतले लेखही वाचायला मिळतात. मात्र शवविच्छेदन कसं केलं जातं? हे समजणं सोपं आहे. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

शवविच्छेदनाचा इतिहास काय? भारताचं योगदान काय?

पोस्टमॉर्टेमला ऑटोप्सी असंही म्हटलं जातं. इस. पूर्व ३५०० मद्ये सर्वात आधी इराकमध्ये एका प्राण्याच्या शरीराचं शवविच्छेदन करण्यात आलं. देवाचा संदेश काय आहे ते समजून घ्यायचं म्हणून प्राण्याच्या विविध अवयवांची तपासणी करणं आवश्यक आहे असं तेव्हा समजलं गेलं. यानंतर १४ व्या शतकात इटलीच्या विद्यापीठात डिसेक्शन शिकवण्यास सुरूवात झाली. भारतात शवविच्छेदन कधी सुरू झालं? याकडे वळलं तर लक्षात येतं की चाणक्याने शवविच्छेदनाचं महत्त्व ओळखलं होतं. मृत्यूचं कारण नेमकं काय? हे जाणून घ्यायचं असेल तर शवविच्छेदन करायला हवं हे चाणक्याने ओळखलं होतं. याच परंपरेत महर्षी सुश्रुत यांचंही नाव घेतलं जातं. त्यांना भारतात शस्त्रक्रियेचे जनक असंही संबोधलं जातं. सुश्रुत संहितेत शस्त्रक्रियेशी संबंधित त्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्या आजही डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. इतिहासातल्या या महितीच्या आधारेच आपण शवविच्छेदन या विषयात खूप प्रगती केली आहे.

काय असतं शवविच्छेदन? किती प्रकार असतात?
शवविच्छेदनचा अर्थ सरळ शब्दात सांगायचा झाला तर फॉरेन्सिक एक्सपर्ट शवविच्छेदन करून मृत्यूचं नेमकं कारण शोधू शकतात. मृतदेहाची ओळख पटवायची असेल, मृत्यूची अचूक वेळ सांगायची असेल तरीही शवविच्छेदन केलं जातं. अनेकदा मृतदेहाचं विघटन झालेलं असतं. अशा परिस्थितीतही मृत्यू किती वाजता झाला ते सांगितलं जाऊ शकतं. शवविच्छेदनाचे दोन प्रकार असतात. मेडिको लीगल पोस्टमॉर्टेम हे पोलिसांनी किंवा मॅजिस्ट्रेटनी सांगितल्यावर केलं जातं. तर दुसरा प्रकार आहे क्लिनिक पोस्टमॉर्टेम. अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे शवविच्छेदन केलंजातं. मात्र या प्रकारच्या शवविच्छेदनात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते.

शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया काय असते?

शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया कशी असते याबाबत डॉक्टर सांगतात की मेडिको लीगल शवविच्छेदन करायचं असतं तेव्हा त्यासंबंधीचे सगळी कागदपत्रं ही पोलीस घेऊन येतात. पोलीस हे सांगतात की संबंधित मृतदेहाचं शवविच्छेदन करायचं आहे. फक्त गुन्हा घडला आहे म्हणूनच शवविच्छेदन केलं जात नाही. तर अपघाती मृत्यू, संशयास्पद मृत्यू, आत्महत्या अशा प्रकरणांमध्येही शवविच्छेदन केलं जातं. पोलीस जो तपास करत असतात त्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो शवविच्छेदन अहवाल. पोस्टमॉर्टेम करणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढीच महत्त्वाची असते वेळ. या पोस्टमॉर्टेमला विलंब लावून चालत नाही.

शवविच्छेदनाचा अहवाल देण्याची मुदत काय असते?

डॉ. सुनील दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदनाचा अहवाल देण्याचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे नियम आहेत. पंजाब आणि हरयाणा कोर्टाने हे निर्देश दिले आहेत की २४ तासांच्या आत शवविच्छेदन अहवाल सोपवला गेला पाहिजे. असं जेव्हा करायचं असतं तेव्हा पोलिसांना तुम्ही शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत थांबवून ठेवलं तरीही चालणारं असतं. जेव्हा पोलीस किंवा कोर्टाकडून शवविच्छेदन करायचं आहे हे सांगितलं जातं तेव्हा आम्हाला मृत व्यक्तीच्या नातेवाईकाची संमती लागत नाही. ही बाब पोलीस प्रशासन आणि आमच्यातली असते असंही डॉ. दहिया यांनी सांगितलं.

रात्री शवविच्छेदन केलं जाऊ शकतं का?

सुरूवातीला हे म्हटलं जायचं की शवविच्छेदन फक्त दिवसाच होऊ शकतं रात्री नाही. मात्र काळानुसार या नियमांमध्ये बदल झालेले पाहण्यास मिळतात. केंद्र सरकारने जे नवं धोरण लागू केलं आहे त्यानुसार काही प्रकरणांमध्ये रात्रीही शवविच्छेदन केलं जातं. मात्र ही गोष्ट काही विशिष्ट प्रकरणांमध्येच होते. जर मृत माणसाची हत्या झाली असेल आणि त्याच्या शरीरावर जखमा असतील तर त्या परिस्थितीत रात्री शवविच्छेदन केलं जात नाही. कारण रात्रीच्या वेळी शरीरावर नेमक्या किती जखमा आहेत याचा अंदाज लावता येत नाही. काही विशिष्ट हायप्रोफाईल केसेसमध्येच रात्री शवविच्छेदन केलं जातं.

शवविच्छेदन सोपं नसतं, असतात अनेक आव्हानं

शवविच्छेदन करणं ही बाब सोपी नसते. यामध्ये अनेक आव्हानंही असतात. डॉक्टर सांगतात अनेकदा आमच्याकडे असं मृत शरीर येतं ज्याचं विघटन झालेलं असतं. काही काही वेळा मृतदेह प्राणी, पक्षी यांनी अर्धवट खालेल्ल्या अवस्थेत असतात. अशावेळी मृतदेहावरून व्यक्तीची ओळख पटवणं हे खरोखरच आव्हान असतं.

शवविच्छेदनाबाबत चुकीच्या समजुती

शवविच्छेदनाबाबत काही चुकीच्या समजुतीही आहेत. पोस्टमॉर्टेम केल्यानंतर डॉक्टर मृत व्यक्तीच्या शरीरातील किडनी काढून विकतात असा एक समज आहे. मात्र तो संपूर्णपणे चुकीचा आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ करोनाच्या काळात व्हायरल झाला होता मात्र नंतर समजलं की तो एका सिनेमातला प्रसंग होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर त्याचं शवविच्छेदन केलं जातं तेव्हा त्याचा कुठलाही अवयव काढता येत नाही. तो काढून काही उपयोगही नसतो असं डॉक्टर सांगतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने देहदान केलं असेल तर त्यासाठी त्याचे अवयव दान करण्यासाठीची एक वेगळी टीम असते. कुठलाही डॉक्टर कुठल्याही व्यक्तीचे अवयव काढतो, विकतो असं होत नाही. शवविच्छेदनाविषयी समाजात या चुकीच्या धारणा आहेत ज्या दूर होणं आवश्यक आहे असंही डॉक्टर्स सांगतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 21:10 IST

संबंधित बातम्या