Indian-origin Zohrab Mamdani New York Mayor अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. मंगळवार (२४ जून) न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानी यांना मोठा विजय मिळाला आहे. जोहरान ममदानी यांना आव्हान देणाऱ्या अँड्र्यू कुओमो यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यांनी आपल्या विजयी भाषणात म्हटले, “मी या शहरासाठी लढेन. तुमच्यासाठी काम करीन.”
मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये मतदारांनी या वर्षी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी रँकिंग-चॉइस सिस्टीममध्ये मतदान केले. सर्वांत जास्त पसंती असलेल्या कुओमो यांना केवळ ३६.४ टक्के मते मिळाली. त्यामुळे ममदानी यांचा विजय निश्चित आहे. ममदानी यांनी स्वतःचा विजय हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वांत वाईट स्वप्न असल्याचे म्हटले आहे. कोण आहेत जोहरान ममदानी? त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत विजय कसा मिळवला? त्यांच्या विजयाने काय बदलेल? त्याविषयी जाणून घेऊयात…
जोहरान ममदानी कोण?
- जोहरान ममदानी यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतातील आहे. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.
- जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.
- ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले.
- २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.

जोहरान ममदानी यांनी अमेरिकेमधील मेन राज्यातील बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये बॅचलर पदवी मिळवली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एक सल्लागार म्हणून काम केले आणि कमी उत्पन्न असलेल्या घरमालकांना बेदखल होण्यापासून रोखण्यास मदत केली आहे, असे न्यू यॉर्क असेंब्लीच्या वेबसाइटवरील त्यांच्या अधिकृत प्रोफाइलमध्ये नमूद करण्यात आले आहे. २०२० मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यापूर्वी ममदानी यांनी रॅप आणि लेखन क्षेत्रातही काम केले आहे.
त्यांच्या विधानसभेच्या प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की, जोहरान यांना न्यू यॉर्क स्टेट विधानसभेत सेवा देणारी पहिली दक्षिण आशियाई व्यक्ती म्हणून मान मिळाला आहे. तसेच हे पद भूषविणारी युगांडातील पहिली व्यक्ती असल्याचा त्यांना अभिमान आहे. मुख्य म्हणजे हे पद भूषविणारे ते मुस्लीम समुदायातील तिसरी व्यक्ती आहेत. बऱ्याच काळापासून अशा समुदायांना आपल्या राज्याच्या राजकारण आणि प्राधान्यांमधून वगळण्यात आले आहे, असेही त्यांनी अनेकदा म्हटले आहे.
त्यांचे हे पद किती महत्त्वाचे?
जगातील सर्वांत महागड्या शहरांपैकी एक अशी न्यू यॉर्क शहराची ओळख आहे. शहरात भाडे आणि किराणा मालाच्या किमती कमी करणे यांसारख्या धोरणांवर ते लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, ही धोरणे वार्षिक एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे ८.६ कोटी रुपये कामावणाऱ्या न्यू यॉर्कमधील सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांकडून दोन टक्के कर आकारून राबविले जातील. बर्नी सँडर्स आणि अलेक्झांड्रा ओकासिओ-कॉर्टेझसह इतर प्रमुख लोकशाही समाजवाद्यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. ममदानी यांची दृश्यमानता, त्यांनी तळगाळात उतरून केलेले काम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट केलेले छोटे व्हिडीओ या गोष्टी त्यांच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या, असे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्या प्रचारात ‘दीवार’सारख्या बॉलीवूड चित्रपटातील डायलॉगचादेखील वापर केला होता.
ममदानी यांनी प्रचारात हिंदी व उर्दू या दोन्ही भाषांचा वापर केला होता. ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “लोक ज्या संकटांना तोंड देत आहेत, त्यांच्याशी थेट बोलणाऱ्या राजकारण्यांची आपल्याला गरज आहे.” ममदानी यांनी सरकारी यंत्रणा इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई)वरदेखील तीव्र टीका केली आहे. या यंत्रणेने बेकायदा स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी छापे टाकले आहेत. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत देशभर निदर्शने झाली आहेत. शनिवारी न्यू यॉर्कमधील त्यांचे सहकारी उमेदवार ब्रॅड लँडर यांना आयसीईने अटक केली, त्यावरदेखील ममदानी यांनी टीका केली.
ममदानी यांनी कुओमो यांचा पराभव कसा केला?
कुओमो हे पूर्वी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. एकेकाळी त्यांच्या वडिलांनीही हे पद भूषवले होते. २०२१ मध्ये अनेक महिलांनी कुओमो यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत कुओमो यांना उमेदवारी मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या चौकशीत सध्याचे डेमोक्रॅट महापौर एरिक अॅडम्स यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी हे आरोप फेटाळले आणि ते आता स्वतंत्र उमेदवार म्हणून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे डेमोक्रॅटिकमधून कुओमो यांना उमेदवारी देण्यात आली. कुओमो यांनी ममदानी यांच्या प्रशासकीय अनुभवावर आणि पॅलेस्टाईन समर्थक भूमिकेवार टीका केली. त्यांच्यावर आरोप केला की, ते यहुदीविरोधी कार्यात सहभागी आहेत.
इस्रायलनंतर सर्वांत जास्त ज्यू समुदाय न्यूयॉर्कमध्ये आहे. ममदानी यांना उमेदवारांच्या एका चर्चेत विचारण्यात आले होते की, ते महापौर म्हणून इस्रायलला भेट देणार आहेत का. त्यावर त्यांनी म्हटले, “महापौर म्हणून मी न्यूयॉर्कमधील ज्यूंसाठी उभा राहीन आणि ते जिथे कुठे असतील, तिथे जाऊन त्यांची भेट घेईन.” ममदानी यांनी कुओमो यांना मिळणाऱ्या निधीच्या स्रोतांवर टीका केली आणि त्यामध्ये मोठ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या निधीवरही टीका करण्यात आली.
प्रत्यक्ष निकाल कधी कळतील?
न्यूयॉर्क सिटी रँकिंग-चॉइस सिस्टीम निका किमान १ जुलैपर्यंत जाहीर करणार नाही. परंतु, ममदानी या निवडणुकीत आघाडीवर आहेत, हे स्पष्ट आहे. रँकिंग-चॉइस मतदान प्रणालीत मतदारांना पाच उमेदवारांची निवड करण्याची परवानगी असते. जर पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवू शकला नाही, तर आणखी फेऱ्या होतात. नोव्हेंबरच्या निवडणुकीत प्राथमिक निवडणुकीतील विजेत्याचा सामना एरिक अॅडम्स आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांच्याशी होईल. कुओमो यांनी मंगळवारी रात्री ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, ते अजूनही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून लढू शकतात.
ममदानी यांची निवड राष्ट्रीय राजकारणाचे चित्र बदलणार?
ममदानी यांची निवड झाल्यास ते शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन आणि पहिले मुस्लीम महापौर असतील. हा निकाल डेमोक्रॅटिक पक्षाचे भविष्य घडवण्यास मदत करू शकतो. २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा पराभव झाला होता केला आणि रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅटिक पक्षाच्या पारंपरिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश आले होते. २०२० च्या निवडणुकीत, जो बायडेन न्यूयॉर्कमध्ये २३ टक्क्यांच्या फरकाने विजयी झाले होते. परंतु, चार वर्षांनंतर कमला हॅरिस यांना हे यश मिळवता आले नाही.