Zohran Mamdani’s wife Rama Duwaji: गेल्या काही दिवसांपर्यंत न्यूयॉर्कमधील सर्वांत जवळून पाहिल्या जाणाऱ्या राजकीय मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक शांत व्यक्तिमत्त्व चर्चेत आलं, त्या म्हणजे रमा दुवाजी. न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये जोहरान ममदानी यांच्या विजयाची घोषणा करताच सर्वांच्या नजरा त्यांच्या पत्नीकडेसुद्धा वळल्या. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, ३३ वर्षीय माजी गव्हर्नर अँड्र्यूज कुओमो यांना पराभूत करून ममदानी यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. कुओमो यांना ३६ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली. गेल्या अनेक दशकांमधील ही सर्वांत मोठी राजकीय उलथापालथ होती.
क्वीन्समधील विजयी भाषणादरम्यान, ममदानी यांनी त्यांच्या पत्नीचे आभार मानण्याची संधी सोडली नाही, कारण त्यांनी ममदानी यांना सर्वात जास्त पाठिंबा दिला. “मला माझ्या पत्नीचे आभार मानावे लागतील… रमा धन्यवाद…”, असे खूप शांतपणे म्हटल्यावर त्या दोघांवरही टाळ्यांचा वर्षाव झाला. २७ वर्षीय रमा दुवाजी या भाषणादरम्यान त्यांच्या शेजारीच उभ्या होत्या. पतीच्या कामगिरीचा खूप अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. येत्या नोव्हेंबरमध्ये विद्यमान महापौर अॅडम्स आणि रिपब्लिकन प्रतिस्पर्धी कर्टिस स्लिवा यांना हरवून ममदानी विजयी ठरले, तर ते न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर ठरतील. ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी निवडणूक लढवीत असताना त्यांची २७ वर्षीय पत्नी रमा दुवाजी न्यूयॉर्कच्या भावी फर्स्ट लेडीच्या टॅगसह सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होत्या.
सामाजिक प्रश्नांवर बोलणाऱ्या एक धाडसी सीरियन अमेरिकन कलाकार
पतीच्या राजकीय विजयानंतर प्रकाशझोतात येण्याआधी रमा दुवाजी यांनी कलेच्या जगात त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रमा या मूळच्या दमास्कस, सीरिया येथील आहेत२०२१ मध्ये त्या न्यूयॉर्कमध्ये आल्या. त्यांनी व्हर्जिनियातील कॉमनवेल्थ विद्यापीठातून कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बीएफए पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्या एक सीरियन अमेरिकन चित्रकार म्हणून ओळखल्या जातात. प्रत्यक्षात रमा दुवाजी या एक मल्टीमिडिया आर्टिस्ट आहेत. रमा यांनी त्यांच्या कामातून कायमच प्रतिकार व अन्याय या विषयांवर प्रकाश टाकला आहे. अनेकदा त्यांनी पॅलेस्टाईना पाठिंबा दिला. कलेच्या माध्यमातून त्या अनेक धाडसी विषयांना हात घालतात. मे महिन्यात त्यांच्या एका अॅनिमेशन चित्रपटात एक गाझामधील मुलीनं हातात रिकामं भांडं धरलेलं दाखवलं आहे, ज्यावरून भूक संकटाचा विषय त्यांनी मांडला होता. या कामासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये रमा यांनी म्हटले, “मी हे काम करीत असताना इस्रायल गाझावर सलग हवाई हल्ले करीत होते. त्यावेळी निर्वासित आणि विस्थापितांना मदत करणाऱ्या एका संस्थेशी मी जोडले गेले.”
ठळक बाबी:
- न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बनले आहेत.
- त्यांनी प्राथमिक निवडणुकीत माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला आहे.
- त्यांच्या पत्नी रमा दुवाजी, एक मल्टीमीडिया कलाकार आहेत आणि त्या पॅलेस्टाईन समर्थक थीमवर काम करतात.
- ममदानी यांनी विजयी भाषणात आपल्या विजयासाठी पत्नीचे आभार मानले आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेतले.

या वर्षाच्या सुरुवातीला रमा यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते की, कलाकारांनी जागतिक समस्यांबद्दल बोललं पाहिजे का? गायिका नीना सिमोन यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत रमा म्हणाल्या, “माझ्या मते कलाकाराचे कर्तव्य म्हणजे काळाचे प्रतिबिंब दाखवणे. अन्यायाविरुद्ध बोलण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे; मात्र कलेत याबाबत जागरूकता निर्माण करण्याची क्षमता आहे.”
रामा दुवाजी यांनी आतापर्यंत द न्यूयॉर्कर, द वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी, अॅपल, स्पॉटिफाय, व्हाईस व लंडनमधील टेट मॉडर्न यांसारख्या प्रमुख जागतिक संस्थांसोबत काम केलं आहे. त्यांच्या कामाबाबत त्या कायम इन्स्टाग्रामवर काही ना काही पोस्ट शेअर करीत असतात. त्यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या पोस्टमधून अनेकदा इस्रायली हिंसाचाराबाबत आणि संघर्षाभोवती अमेरिकेच्या धोरणांवर टीका करणारे चित्रण दिसून येते. ममदानी यांनी शेअर केलेल्या त्यांच्या एका अॅनिमेशनमध्ये न्यूयॉर्कमधील एक धर्मादाय संस्थेवर इस्रायली युद्धादरम्यान गुन्ह्यांसाठी निधी पुरवल्याचा आरोप आहे, अशी टीका केली आहे.
डेटिंग अॅप ते लग्नापर्यंतचा प्रवास
रमा दुवाजी यांच्यासोबतच्या लव्ह स्टोरीबाबत सांगताना ममदानी यांनी सांगितले होतं की, “मी माझ्या पत्नीला हिंगे या अॅपवर भेटलो आणि त्यानंतर आम्ही डेटिंग सुरू केलं.” द बुलवॉर्क पॉडकास्टच्या एका भागात ममदानी यांनी हे सांगितलं होतं. ममदानी यांनी एप्रिल २०२२ मध्ये इन्स्टाग्रामवर एकत्रित एक फोटो शेअर केला होता. तेव्हा त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती. २०२४ मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यावेळी ममदानी यांनी रमा यांचा फोटो अंगठीच्या इमोजीसह आणि हार्ड लाँच अशा हॅशटॅगसह शेअर केला होता. सोबत माझ्या आयुष्यातली प्रेरणा, अशी कॅप्शनही लिहिली होती. त्यावर त्या दोघांच्या मित्र आणि अनुयायांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क सिटी क्लार्कच्या कार्यालयात दोघांनी एक सोहळा आयोजित केला होता.