‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या गजराने गुरुवारी रात्रीपासून अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आणि ढोल-ताशाच्या गजरात घरोघरी आणि मंडपस्थळी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. तर गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत गणरायाच्या आगमनाच्या तयारीत गुरुवारी भाविक व्यस्त होते. आगमन सोहळ्यात कमतरता राहू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते काळजी घेत होते. दरम्यान, ‘लालबागच्या राजा’चे पहिल्याच दिवशी दर्शन घेता यावे यासाठी भाविकांनी गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून रांग लावली.
गेले दोन-तीन महिने मूर्तिकार रात्र जागवून गणेशमूर्ती साकारण्यात मग्न होते. शुक्रवारी गणेश चतुर्थी असल्यामुळे गेल्या आठवडय़ात मूर्तीवरून अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार व्यस्त होते, तर गणेशोत्सवात काही कमतरता राहू नये यासाठी गेले महिनाभर मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक खपत होते. अखेर मूर्तिकार आणि भाविकांची प्रतीक्षा संपुष्टात आली आणि गुरुवारी रात्रीपासूनच मुंबापुरी गणेश आगमन सोहळ्यात दुमदुमून गेली. ढोल-ताशाचा गजर आणि गुलालाची उधळण करीत अनेक मंडळांनी गणेशमूर्ती मंडपस्थळी आणली, तर घरोघरी मोठय़ा जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते गुरुवारी सज्ज झाले होते. आगमन सोहळ्यात कमतरता राहू नये यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. गणेश आगमन सोहळ्यात लेझीम पथक, ढोल-ताशा, कच्छी बाजा आदी वादकांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाजंत्रीवाल्यांशी आधीच बोलणी करून ठेवली आहेत. परंतु ते वेळेवर यावेत यासाठी कार्यकर्ते सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. सार्वजनिक मंडळाचे काही कार्यकर्ते सजावटीवरून अखेरचा हात फिरविण्यात मग्न होते. गणरायाच्या प्राणप्रतीष्ठेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काळजी घेण्यात येत होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने फूल आणि फळबाजारांमध्येही भाविकांची लगबग सुरू झाली होती. गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाला हलवायांच्या दुकानात प्रचंड मागणी होती. मोदक खरेदीसाठी अनेक भागांतील हलवायांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांची प्राणप्रतीष्ठा करण्यासाठी गुरुजी आपापले वेळापत्रक तयार करीत होते. यजमानांचा खोळंबा होऊ नये म्हणून गुरुजी मंडळी नियोजनात व्यस्त होते. अवघी मुंबापुरी गणेश आगमनाच्या तयारीत व्यस्त होती.