भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यांनी एकाच दिवशी थोड्या अंतराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. धोनी आणि रैना यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. २००८ पासून दोघे IPLमध्येदेखील CSKकडून खेळत आहेत. चेन्नईला विजेतेपदं जिंकवून देण्या धोनीप्रमाणेच रैनाचाही मोठी सहभाग आहे. पण २०२० हे साल CSK आणि धोनी-रैना मैत्रीच्या दृष्टीने काहीसं वाईट जात असल्याचं दिसत आहे. सध्या सुरेश रैनाने CSK आणि महेंद्रसिंग धोनी दोघांना ट्विटरवर अनफॉलो केल्याची चर्चा आहे. मात्र यात किती तथ्य आहे जाणून घ्या…

रैनाने CSK, धोनीला केलं अनफॉलो?

सुरेश रैना आणि CSK, धोनी यांच्यात वाद झाल्याचे संघमालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. त्या मुलाखतीनंतर रैना आणि श्रीनिवासन दोघांनीही वक्तव्याचा विपर्यास केला असून रैना आणि CSKमध्ये सारं अलबेल असल्याचं भासवलं. धोनीसोबत तथाकथित हॉटेल रूम वादानंतर रैना भारतात परतला आणि त्यानंतर काही दिवसांतच त्याने पुन्हा CSKमध्ये दाखल होण्याबाबत संकेत दिले. CSKला मैदानावर काही समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं पाहता चाहत्यांनी रैनाला परत बोलवण्याची मागणी केली. त्यावर CSKच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याचं कमबॅक शक्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. त्यानंतर रैना आणि CSK यांच्यातील तणाव वाढला आणि रैनाने CSK व धोनी यांनी ट्विटरवर अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या. याबाबत नीट माहिती घेता, रैना धोनीला अनफॉलो केले नसल्याचं उघड झालं. पण CSKला रैनाने ट्विटरवरून अनफॉलो केलं असल्याचं दिसलं. त्यामुळे रैना आणि CSK संघ व्यवस्थापन यांच्या नक्की काय बिनसलं असावं, याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे.

हॉटेल रूमवरून धोनीसोबतच्या वादावर काय म्हणाला होता रैना?

“धोनी आणि माझ्यात रूमवरून वाद झाला ही बाब खोटी असून कोणीतरी अफवा पसरवत आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. पण ज्यांना वाटतं की CSK आणि मला यश मिळू नये अशा लोकांनी अशा वावड्या मुद्दाम उठवल्या आहेत आणि अशा गोष्ट मुद्दाम रंगवून सांगितल्या जात आहेत”, असे रैनाने स्पष्ट केलं होतं.

CSKचे मालक एन श्रीनिवासन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर…

“श्रीनिवासन हे मला माझ्या वडिलांप्रमाणे आहे. कठीण प्रसंगात नेहमी त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. ते मला त्यांच्या धाकट्या मुलासारखं मानतात. मला खात्री आहे की त्यांच्या मुलाखतीतील काही वक्तव्य चुकीच्या पद्धतीने वळवली गेली असतील. माझ्या माघारीचे कारण त्यांना सुरूवातीला माहिती नव्हते, पण आता मात्र सारं सुरळीत झालं आहे”, असं रैना म्हणाला होता.

CSKबाबत बोलताना रैना म्हणाला होता…

“CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासाठी माघारीचा निर्णय खूप कठीण होता. पण माझ्यात आणि CSKमध्ये कोणताही वादविवाद नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी सध्या इथे क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असे रैनाने सांगितलं होतं.