IPL 2020 CSK vs SRH: हैदराबादविरूद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने १६७ धावा केल्या होत्या. त्यात शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीच्या ८१ धावांच्या भागीदारीचे मोठे योगदान होते. १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून अनुभवी केन विल्यमसनने एकाकी झुंज देत अर्धशतक (५७) ठोकले, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. धोनीच्या चेन्नई संघाने स्पर्धेतील तिसरा विजय साकारला.

१६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (९), मनिष पांडे (४), विजय शकंर (१२), प्रियम गर्ग (१६) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती पण तोदेखील २३ धावा काढून बाद झाला. केन विल्यमसनने मात्र खेळपट्टीवर तळ ठोकत एकाकी झुंज दिली, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळून शकली नाही. विल्यमसनने ७ चौकारांसह ३९ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याच्यानंतर राशिद खानने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी २ तर सॅम करन, शार्दूल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी १-१ बळी टिपला.

विल्यमसनची एकाकी झुंज-

नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा CSKला आधी फलंदाजीची संधी मिळाली. नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. सॅम करनने फटकेबाजी केली, पण त्याला संदीप शर्माने ३१ धावांवर त्रिफळाचीत केला. त्यानंतर शेन वॉटसन आणि रायडु यांनी डाव सावरत ८१ धावांची भागीदारी केली. पण दोघांनाही अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. वॉटसन ४२ तर रायडू ४१ धावांवर माघारी परतला.

शेन वॉटसन-

अंबाती रायडू-

धोनीने २ चौकार आणि १ षटकार खेचत थोडी चमक दाखवली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २१ धावांवर बाद झाला. पण रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत तळ ठोकत १० चेंडूत नाबाद २५ धावा कुटल्या आणि चेन्नईला १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांना २-२ बळी मिळाले.