शासकीय रेखा व रंगकला परीक्षेसाठी मुक्तहस्त हा आवश्यक विषय असतो. वास्तविक पाहता चित्राचे रेखाटन हे आपल्या सरावाच्या साहाय्याने केलेल सहज (मुक्त) रेखाटन असते. यातील आकारांचे सौंदर्य ओघवत्या रेषेच्या गुंफण पद्धतीने अलंकारिक होते. मूळ नैसर्गिक आकारांच्या ठेवणीवर अलंकारिक साज चढवलेला असतो. पाने, कोयऱ्या, वेलींची गुंफण (वळणदार रेषा) यांची रेलचेल त्यात दिसते. आता विषय अंगी ‘मुक्तहस्त’ चित्रणाचा पेपर देण्याची पद्धत सुरू झाली आहे. परीक्षा वेळापत्रकानुसार हा पाचवा पेपर असतो. एलिमेंटरी परीक्षेसाठी फक्त दीड तास दिला जातो. प्रश्नपत्रिका म्हणून काळय़ा शाईत जाड वा बारीक रेषा/ आकाराचे एक छोटे रेखाटन दिले जाते. त्यावरून उत्तरपत्रिकेच्या कागदास योग्य दिसेल, शोभेल, प्रमाणबद्ध रेखाटन करा, असे सांगितलेले असते. ज्या पद्धतीत रेषा किंवा आकारमान जाड/ बारीक असेल, तसे रेखाटणे आवश्यक असते. अचूक रेखांकन आणि प्रमाणबद्धता या दोन्ही बाबींना महत्त्व असते.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी अडीच तास दिले जातात. एलिमेंटरी परीक्षेप्रमाणेच मुक्तहस्तचित्र देण्यात येते. ते जसेच्या तसे रंगवावे लागते. यात रंगकौशल्य व आकारमान यांना गुण असतात. चित्र कागदास शोभेल असे रेखाटावे. अतिशय लहान चित्र रंगकामास वेळ लावते. तसेच एकदम मोठय़ा आकाराचे रेखाटन केल्यास चित्रघटकांचा रंग एकसारखा (प्लेन) दिसत नाही. यास्तव प्रमाणबद्धतेकडे लक्ष देणे आवश्यक असते. नियमित सरावाने मुक्तहस्तचित्राचा पेपर उत्तम जाईल. चित्रातील रंगकाम प्लेन हवे. त्यावर संकल्पनासारखे ‘टेक्चर’ करण्याचा प्रयत्न करू नये.

महत्त्वाच्या सूचना-
१) चित्र कागदाच्या प्रमाणात असावे. ते फार लहान किंवा मोठे असू नये.
२) सप्रमाण भाग पाडता येईल असे चित्र काढायला दिले असल्यास आधी एक मध्यरेषा काढून घ्या व डाव्या बाजूकडून चित्र काढण्यास सुरुवात करा.
३) चित्राचा बाहय़ आकार (आकृती) उंच असल्यास कागद उभा घ्या व रुंद असल्यास कागद आडवा घ्या.
४) नमुना म्हणून दिलेल्या चित्राचा नीट अभ्यास करा. चित्राचा आकार कसा आहे हे नक्की करून नमुन्याप्रमाणे बाहय़ आकाराचे रेखांकन हलक्या हाताने कागदावर करून घ्या. हे रेखांकन काढून झाल्यावर आतील मुख्य आणि गौण आकार योग्य त्या प्रमाणात काढा.

५) डाव्या बाजूने रेखांकन पूर्ण झाल्यावर मध्यरेषेच्या दुसऱ्या बाजूला एक सप्रमाण आडवी रेषा हलक्या हाताने काढा. उजव्या व डाव्या बाजूचे आकार उंची व रुंदी यादृष्टीने सप्रमाण ठेवण्यास या रेषेची मदत होईल. दोन्ही बाजूंच्या मापात जितका सारखेपणा ठेवाल तितके चित्र अधिक समतोल वाटेल.
६) चित्र काढताना यांत्रिक (भूमितीची) साधने अथवा ट्रेसिंग पेपरचा उपयोग करू नये.
७) चित्रातील रेषा तुटक तुटक, मधे मधे जाड किंवा बारीक नसाव्यात. रेषा एकसारख्या रुंदीच्या, सफाईदार, वळणदार असाव्यात. काळजीपूर्वक काढलेल्या अशा रेषा चित्राला आकर्षक रूप देतात.
८) चित्राचे रंगकाम करताना मोजकेच रंग वापरा.

-सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या, चित्रलीला निकेतन, पुणे</strong>

क्रमशः

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
रेखाटन संकल्प चित्रांचे (भाग पाच)
स्मृतिचित्रे कशी काढावी? (भाग चार)
स्थिर चित्र कसे काढावे? (भाग तीन)
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेविषयी (भाग एक)