साखर उद्योगाची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली त्यामुळे समाधान झाले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी फडणवीसांना लगावला. दरम्यान, शरद पवार यांच्यामुळे या उद्योगातील लाखो कुटुंबीयांना आजपर्यंत स्थैर्य मिळाले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी मुश्रीफ यांनी केला.

केंद्र सरकारमुळे साखरेच्या विक्री दरामध्ये प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ होणार असून साखर उद्योगासाठी ही बाब स्वागतार्ह आहे, याची कबुली देतानाच या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोंबरपासून होणार असल्यामुळे व्यापाऱ्यांचाच फायदा होणार आहे, याकडे लक्ष वेधले. प्रतीटनामागे ४०० ते ४५० रुपये साखर कारखाने तोटा सहन करीत आहेत. त्यामुळे अतिरिक्त कर्ज व व्याजामुळेच कारखानदार घायकुतीला आलेले आहेत. यासाठी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,५०० रुपये करणे आवश्यक होते, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

भाजपातील आयारामांना चिमटा

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊसकरी, शेतकरी, साखर उद्योगातील आयाराम भाजपा नेत्यांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीत बफर स्टॉकची मुदत, साखर निर्यात, कारखान्यांना तोटा भरून काढण्यासाठी प्रतिटन ६०० रूपये अनुदान देणे, इथेनॉलचे दीर्घकालीन धोरण ठरवून आर्थिक मदत करणे याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि आयाराम भाजपा साखर कारखानदारांना धन्यवाद देतो, असा चिमटाही मुश्रीफ यांनी यावेळी काढला.