News Flash

शिवाजी विद्यापीठ गुणवत्तेत अव्वल

‘नॅक’चे ‘ए प्लस प्लस’ मानांकन

(संग्रहित छायाचित्र)

शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकनातील आपला अव्वल दर्जा याही वेळी कायम राखला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेने (नॅक) शिवाजी विद्यापीठाला ‘ए प्लस प्लस’ मानांकन जाहीर केले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या ‘नॅक’ मानांकनाची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू होती. यावेळच्या बदललेल्या पद्धतीप्रमाणे ७० टक्के गुण हे संख्यात्मक माहिती आधारे दूरभाष संवादाद्वारे देण्यात आले होते. उर्वरित ३० टक्के गुणांसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष पाहणी होणार होती. त्यासाठी ‘नॅक’ समितीचे अध्यक्ष प्रा. जे. पी. शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकाने १५ ते १७ मार्च या कालावधीत विद्यापीठात कुलगुरू, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा केली होती. त्याचे सादरीकरणही करण्यात आले होते. या समितीने विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन, संशोधनाचा उच्च दर्जा असल्याचा अहवाल ‘नॅक’च्या बंगळुरू कार्यालयास सादर केला होता. या अहवालावर कार्यालयीन प्रक्रिया होऊन ‘ए प्लस प्लस’ मानांकन जाहीर करण्यात आले. त्याचे पत्र विद्यापीठाला मिळताच ही माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केली.

मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदींचे अनेक प्रतिष्ठितांनी आणि बुद्धिवंतांनी अभिनंदन केले. कुलगुरू पदाची सूत्रे अलीकडेच हाती घेतलेले डॉ. शिर्के यांना लगेचच मानांकनाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. उच्च दर्जाचे मानांकन मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

विद्यापीठाचीच ‘परीक्षा’

* ७० टक्के गुण संख्यात्मक माहिती आधारे दूरभाष संवादाद्वारे देण्यात आले होते. उर्वरित ३० टक्के गुणांसाठी विद्यापीठात ‘नॅक’ समिती प्रत्यक्ष पाहणी केली होती.

* ‘नॅक’ समितीचे अध्यक्ष प्रा. जे. पी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुलगुरू, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा केली.

* ‘नॅक’ समितीने विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचा दर्जा उच्च असल्याचा अहवाल ‘नॅक’च्या बंगळुरू कार्यालयास सादर केला. त्यानुसार ‘ए प्लस प्लस’ मानांकन जाहीर करण्यात आले.

माझ्या कुलगुरू पदाच्या प्रारंभीच्या काळातच उच्च दर्जाचे यश मिळाल्याने आनंद झाला. विद्यापीठातील सर्व घटकांना सामावून गुणवत्ता वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा निर्धार आहे.

– डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:29 am

Web Title: shivaji university tops in quality abn 97
Next Stories
1 सुताचे दर घटले, तरी वस्त्रोद्योगात अनिश्चितता
2 ‘गोकुळ’च्या रणांगणावर आरोप-प्रत्यारोपांना धार
3 गोकुळच्या निवडणुकीत रुसवे-फुगवेच अधिक
Just Now!
X