शहरावर लादण्यात आलेला टोल रद्द व्हावा, अशी मागणी चार वर्षांपासून कोल्हापूरवासीय सातत्याने करीत आहे. राज्य शासनाने टोल रद्दची अधिसूचना तातडीने काढावी, या मागणीची आठवण करून देण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी टोलविरोधी कृती समिती व नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन त्यांनी कृती समितीला दिले. आंदोलनावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३० नोव्हेंबपर्यंत टोल रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पुन्हा एक महिन्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबपर्यंत अधिसूचना काढण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता जवळ आली आहे. म्हणूनच राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे टोल रद्द केल्याची अधिसूचना काढण्याची आठवण करून देण्यासाठी बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
टोल विरोधी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले असले तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. युती सरकारने टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी महानगरपालिका सभागृहाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करून जनतेच्या बाजूने निकाल देण्यासाठीच आपला प्रयत्न असणार असल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी टोल विरोध कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, नगरसेवक शारंगधर देशमुख, आदिल फरास, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, गणी आजरेकर, कादर मलबारी, विभा पाटील, रुपाली पाटील, बजरंग शेलार, पुंडलिक नाईक, सखाराम कांबळे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2015 रोजी प्रकाशित
टोल विरोधात धरणे आंदोलन
शहरावर लादण्यात आलेला टोल रद्द व्हावा, अशी मागणी चार वर्षांपासून कोल्हापूरवासीय सातत्याने करीत आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 17-12-2015 at 02:20 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation against toll in kolhapur