३९ जणांना सव्याज भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
आशिया खंडातील प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी येथील डेक्कन सहकारी सूतगिरणीच्या ३९ कामगारांना तब्बल १५ वर्षांच्या संघर्षांनंतर कामगार न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सन २००१ पासून बंद पडलेल्या या संस्थेतील ३९ कामगारांना १ कोटी ८२ लाख रुपये सव्याज द्यावेत, असा निकाल कामगार न्यायालयाने दिला असल्याची माहिती भारतीय कामगार संघाचे नेते बाबासाहेब नलगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ही सर्व रक्कम डेक्कन सूतगिरणीची विद्यमान मालकी असलेल्या के.एस.एल अॅण्ड इंडस्ट्रीजने मिळून ६० दिवसांत द्यायची आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इचलकरंजी येथील डेक्कन को-ऑप सूतगिरणी विविध कारणांनी बंद पडली. या संस्थेने कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या ३९ कामगारांनी भारतीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे व्यवस्थापना विरोधात खटला दाखल केला होता. याबाबत न्यायाधीशांनी हुकूमनामा करून कामगारांना कामावर नसलेल्या कालावधीसह सलग सेवा धरून कामावर घेणेचा आदेश दिला होता. यानंतर वारंवार कामगारांनी कामाची व पगाराची मागणी करूनही व्यवस्थापनाने काम अथवा पगार दिला नाही.
यानंतर २००६ साली के.एस.एल.अॅण्ड इंडस्ट्रीज लि. मुंबई या कंपनीने गिरणी सुरु ठेवली. त्यांच्याकडे कामगारांनी थकीत रक्कमा व कामाची मागणी करूनही त्यांना काम अगर पगार दिला नाही.
त्यामुळे २००१ साली झालेल्या निकालाची अंमलबजावणी करावी अशी मागणी ३९ कामगारांनी कोल्हापूर येथे कामगार न्यायालयात दावा दाखल केला.
या दाव्यात डेक्कन मिलसह के.एस.एल.अॅण्ड इंडस्ट्रीज लि. यांनाही प्रतिवादी केले होते. दोन्ही प्रतिवादींनी न्यायालयात बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश डी .एस . थोरात यांनी के.एस.एल.अॅण्ड इंडस्ट्रीजने ३९ कामगारांना १ कोटी ८२ लाख रुपये सव्याज द्यावेत, तसेच कायदेशीर सर्व देय रकमा देण्यात याव्यात असा आदेश दिला.
के. एस.एल. व्यवस्थापकाने आमची कोणतेही देणे देण्याची जबाबदारी नाही असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता.
या निकालाचा आधार घेऊन डेक्कन सूतगिरणीकडे मोठ्या रकमा अडकलेल्या इचलकरंजी नगरपालिका ,महावितरण, आवाडे जनता बँक , इचलकरंजी अर्बन बँक , विजय पतसंस्था आदींनी रक्कम वसूल करावी, असेही ते म्हणाले. याप्रकरणी कामगारांची बाजू न्यायालयात डी.के.पाटील यांनी मांडली. पत्रकार परिषदेत अध्यक्ष विलासराव रानडे, नंदकुमार आंबले, युवराज जाधव, बाबू चौगुले व इतर उपस्थित होते.