कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यातील महापुराला रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा (बॅरेज) मधील पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी तेथील धरणावर दिले.

कृष्णा खोऱ्याला बसणारा महापुराचा तडाखा रोखण्यासाठी गेली पाच ते सहा वर्षे कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील पाणीसाठा आणि त्या दोन्हीही पाणीसाठ्यांचे परिचलन व्यवस्थित होत नसल्याची सातत्याने तक्रार आहे. त्यामुळेच महापुराचा धोका उद्भवतो, असेही निष्कर्ष आहेत. या पार्श्वभूमीवर समितीतर्फे अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी अलमट्टी प्रकल्पाचे (कर्नाटक जलसंपदा विभाग) अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांच्याबरोबर समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावेळी त्यांनीही पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा : कोल्हापूरमध्ये आढळला ‘पांढरा चिकटा’; डॉ. मकरंद ऐतवडे यांचे संशोधन

महाराष्ट्रात आणि कर्नाटकात महापूर येऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कृष्णा,वारणा व पंचगंगा या नद्यांना येणाऱ्या महापुराने या नद्यांच्या काठावर भीतीचे वातावरण असते. केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे पालन केल्यास आणि त्यानुसार सर्व धरणांचे परिचलन केल्यास महापूर नियंत्रित करता येऊ शकतो हे कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने दाखवून दिले आहे. महापूर रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल सातत्याने शासनासोबत व लोकांच्या सोबत चर्चेतून मार्ग निघावा यासाठी बरेच कार्यक्रम व उपक्रम हाती घेतले आहेत. परंतु अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि ऐन पावसाळ्यात त्यातून होणारा कमी विसर्ग, तसेच हिप्परगी बॅरेज (बंधारा)मधीलही पाणीसाठा याबद्दल अनेक मतमतांतरे होती. त्यामुळे कर्नाटकातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा आणि प्रत्यक्ष अलमट्टी धरणाची पाहणीही आवश्यक होती. त्यानुसार दोन दिवस हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जलतज्ञ, जल अभ्यासक, पत्रकार सहभागी झाले होते.

कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्यांचे हार्दिक स्वागत केले. सविस्तर चर्चा केली. तसेच केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचीही माहिती घेतली. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याप्रमाणेच कर्नाटकातील काही जिल्ह्यानाही महापुराचा दणका बसतो. त्यामुळे महापूर रोखण्यासाठी उपाययोजना अत्यावश्यक आहेत असे अभ्यास गटाने कर्नाटकातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे मनःपूर्वक मान्य केले.

हेही वाचा : शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा लागेल, हसन मुश्रीफ यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा; व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल

अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वा (गाईडलाईन) नुसार व्हावा असे त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास अभ्यास गटाने आणले. त्यांनी सांगितले की आम्ही सीडब्ल्यूसीच्या गाईडलाईन पाळत नाही. त्या पाळल्या पाहिजेत असे कुठेही दिले गेले नाही. परंतु त्या गाईडलाईन पाळणे आवश्यक आहे असे अभ्यास गटाने त्या अधिकाऱ्यांना सांगितले.

यानंतर हिप्परगी बॅरेजचे दरवाजे जूनला उघडले पाहिजेत आणि ते ३० ऑगस्ट पर्यंत ते खुले राहिले पाहिजेत असे त्यांना सांगितले. ते त्यांनी मान्य केले.आम्ही ते दरवाजे आता खुले ठेवू असे सांगितले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चर्चेत ठरल्यानुसार हिप्परगी बॅरेजचे दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत असे अभ्यास गटाला आढळले.

अलमट्टीचे अधीक्षक अभियंता रमणगौडा म्हणाले, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला की कोयना धरणातून विसर्ग वाढवला जातो. त्यामुळे नद्यांना महापूर येतो. याबाबत कोयना धरणाच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी उपाययोजना करायला हव्यात. नद्यांमध्ये वाढती अतिक्रमणे, राष्ट्रीय महामार्ग यामुळे जलप्रवाहात येणारे अडथळे हे सुद्धा महापूर येण्यास कारणीभूत आहेत असे त्यांनी सांगितले.राजापूर बंधाऱ्यातील फळ्या वेळेवर काढल्या जात नाहीत हेही महत्त्वाचे कारण आहे असे ते म्हणाले. कमी दिवसात जास्त पडणारा पाऊस हेच महापुराचे मुख्य कारण असले तरी प्रशासनाकडेही त्यावर उपाय योजना आहेत. त्या कठोरपणे अमलात आणल्या पाहिजेत असेही अभियंता रमणगौडा म्हणाले.

हेही वाचा : शालेय पोषण आहारात यंदापासून १५ लज्जतदार पदार्थ

यावेळी कर्नाटक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी.कुलकर्णी, रवी चंद्रगिरी, कुमार हचीना आदी उपस्थित होते. कृष्णा महापूर समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील,सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रदीप वायचळ, प्रभाकर केंगार, सुयोग हावळ, तसेच आंदोलन अंकुशचे आनंदा भातमारे, पोपट माळी, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगले, या चर्चेच्या वेळी उपस्थित होते.
उमेद वाढवणारी चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासंदर्भात कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्रातील एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यास गटाने अशा पद्धतीची प्रथमच चर्चा केली असावी. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या अभ्यास गटाबरोबर अतिशय आस्थेने सविस्तर चर्चा केली. अशा पद्धतीची घटना कदाचित प्रथमच घडली असावी,असे मत विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला महापूर रोखण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आढळला. आता प्रत्यक्ष महापूर आलाच तर त्यावेळी कसा अनुभव येतो ते पाहू, असेही दिवाण म्हणाले.