कोल्हापूर : रास्त ऊस दराच्या मागणीसाठी कोल्हापुरातील प्रादेशिक सह. संचालक कार्यालयासमोर गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी मागील हंगामातील हिशेब देऊन त्यातील नफा ऊस उत्पादकांना आणि यावर्षीच्या हंगामातील एफआरपी अधिक २०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी गेल्या आठवड्यात या कार्यालयाकडे केली होती.
याबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि सर्व संघटना यांची संयुक्त बैठक घेतली. परंतु, ठोस तोडगा निघाला नाही. याला साखर आयुक्त जबाबदार आहेत. विभागातील कारखान्यांकडून माहिती घेऊन, ती आयुक्तांना देण्याची जबाबदारी प्रादेशिक सहसंचालक यांची आहे. त्यामुळे गुरुवारपासून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
