कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख निवडीवरून पक्षांतर्गत मतभेद ताणले आहेत. या निवडीत विश्वासात घेतले नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत सोमवारी उपनेते संजय पवार यांनी पदाचा राजीनामा देत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे घोषित केले. तर, राजीनामा मागे घ्यावा यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्यावर दबाव आणला.
कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करण्याचा निर्णय ‘मातोश्री’वरून घेण्यात आला. यामुळे शहरात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. त्यातूनच आज संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाप्रमुख निवडीच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
गेली १० वर्षे कामाची पद्धत बदलली आहे. आताही जिल्हाप्रमुखपद निवडीत अन्य तिघे इच्छुक होते. कोणालाही विश्वासात न घेता निवड करण्यात आली असल्याने उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. इतर पक्षांतून बोलावणे येत आहे; पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडणार नाही. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मधुरिमाराजेंवर प्रश्नचिन्हविधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेण्याच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. याबाबत लवकरच बोलणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
माघारीसाठी दबाव
पवार यांनी ही घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांनी, पदाचा राजीनामा देऊ नये, अशी घोषणाबाजी करीत त्यांच्यावर दबाव आणला. सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन संजय पवार यांच्या शिवसेनेतील कार्याचा उल्लेख करून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी केली.