कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याने आधी जाहीर केलेल्या प्रतिटन ३ हजार ४५२ रुपये रक्कम ऊस दरात बदल करून मंगळवारी त्यामध्ये १६२ रुपयांची वाढ केली. आता या कारखान्याकडून ऊसउत्पादकांना या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ६१४ रुपये एकरकमी ऊसदर देण्यात येणार आहे. या ऊस दराचे शेतकऱ्याने आंदोलन स्वागत केले असतानाच हा ऊसदर आंदोलनाचा परिणाम असल्याचीही चर्चा आहे.

बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ४५२ रुपये विनाकपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये बदल करून आता तो प्रतिटन ३ हजार ६१४ रुपये एकरकमी जाहीर केला आहे.

सध्याच्या बाजारस्थितीत हा दर राज्यातील सर्वाधिक ऊसदरांपैकी एक आहे. हा निर्णय कारखान्याच्या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य या परंपरेला साजेसा ठरला आहे. बिद्रीने शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली प्रगती कायम ठेवली आहे.

अवकाळी पावसातही बिद्रीचा शेतकरी हिताचा ऊसदर आहे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी ऊस दरासोबत कृषिपूरक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सर्वांगीण साहाय्य देण्याचा प्रयत्न बिद्री कारखान्याने केला असल्याचे नमूद केले.

पाटील म्हणाले, की रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचा दर प्रचंड वाढला असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणे, उसाला योग्य दर देणे गरजेचे आहे. बिद्रीने शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन ८ हजार ५०० टन क्षमतेने गाळप करण्यास सज्ज असून, तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

अजूनही पावसाची शक्यता असल्याने सुरुवातीला रस्त्याकडेच्या आणि नंतर पूर्ण क्षमतेने ऊसतोड नियोजन केले आहे. १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले. संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, खातेप्रमुख उपस्थित होते.

बिद्री सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांचे मिळून कार्यक्षेत्र असलेला कारखाना आहे. या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक आहे. यामुळे स्वाभाविक साखर कारखान्याकडून सर्वाधिक दर देण्याची परंपरा दर वर्षी कायम राहिली आहे. ‘सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजेच देशाचा खरा विकास’ हे ब्रीद मानून हा साखर कारखाना कार्यरत आहे.