कोल्हापूर : नांदणी जैन मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीचा वाद पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. न्यायव्यवस्था व राज्य शासन दोघेही चालढकल करत असल्याचा संशय व्यक्त करीत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास लवकरच ‘वनतारा’चे प्रमुख अनंत अंबानी यांच्या अंटालिया या निवासस्थानासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राहुल आवाडे यांच्याशी बोलताना गुरुवारी स्पष्ट केले.
या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीच्या विनंतीसाठी शेट्टी हे दिल्ली येथे गेले होते. या घडामोडी बाबत त्यांनी सांगितले की, राज्य शासनाचे सरकारी वकील सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी दुसऱ्यांदा न्यायालयासमोर माहिती देऊनही हत्ती पूर्ववत नांदणी मठामध्ये स्थलांतरित करण्यासाठी न्यायमूर्ती यांच्याकडून प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. नांदणी मठामध्ये चातुर्मासाचे विविध कार्यक्रम सुरू असून त्यात या माधुरी हत्तीचा मान असतो. उच्च स्तरीय समितीने मठाच्या कार्यक्रमास हत्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शासनाने पहिल्यांदा मठातील कार्यक्रमास हत्ती पाठवावा व नंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
नांदणी मठाची लाडकी माधुरी उर्फ महादेवी हत्ती लवकरच गावात परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी यासाठी फडणवीस यांनी संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नांदणीत ‘वनतारा’चे हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी वनतारा व्यवस्थानाला दिले आहेत, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राहुल आवाडे यांनी दिली. यामुळे हत्तीच्या पुनर्वसनाचा मार्ग अधिक सोपा झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वनताराच्या तज्ज्ञ पथकाने नांदणी येथे पाहणी केली होती. यानंतर त्यांनी नांदणीची जागा हत्ती संगोपनासाठी योग्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नांदणीतच हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितले.