कोल्हापूर : हंगामातील उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा यासाठी आंदोलन अंकुश या संघटनेने शनिवारी आक्रमक भूमिका घेत उसाची वाहतूक रोखली. यामुळे शिरोळ येथे कारखानासमर्थक आणि आंदोलन अंकुश यांच्या झटापट झाली. आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यातही यांच्या बाचाबाची झाली.
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा आणि गेल्या हंगामातील आणखी दोनशे रुपये मिळावेत या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिरोळ येथे दत्त कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. यातून कारखाना समर्थक व आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली.
दुपारी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे आंदोलन शिवाजी चौकात झाले असता आंदोलक आणि पोलिसांत हातघाई झाली. धरपकड असताना आंदोलन संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे बेशुद्ध झाले. पोलिसांनी माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
स्वाभिमानी-अंकुश विसंवाद
दरम्यान, दत्त कारखान्याने ऊस दर वाढवून देण्याची भूमिका राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य करीत आंदोलन मागे घेतले. आंदोलन अंकुशने प्रतिटन चार हजार रुपये दिल्याशिवाय गाळप सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेत आजही आंदोलन सुरूच ठेवल्याने संघटित आंदोलन करणाऱ्या दोन्ही संघटनातील मतभेद चव्हाट्यावर आले.
पंचगंगेवर ठिय्या आंदोलन
इचलकरंजीजवळील रेणुका पंचगंगा साखर कारखान्याने ऊस दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना कार्यस्थळी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये पुरंदर पाटील, अमित पाटील, अरुण मगदूम, विनोद मुरचुट्टे, धुळगोंडा पाटील आदींचा सहभाग होता. सायंकाळी व्यवस्थापनाने आंदोलकांशी चर्चा सुरू केली होती. येथे उसाला सुमारे साडेतीन हजार रुपये दर मिळण्याची अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.
सीमाभागात जल्लोष
बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागात कर्नाटक राज्यात उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर द्यावा यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. काल मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांच्याकडे बैठक होऊन ३ हजार ३०० दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांनी या निर्णयाचे स्वागत करीत जल्लोष केला. तथापि, महाराष्ट्रातील बहुराज्य कारखान्यांसमोर ऊसतोडी बंदचे आव्हान असल्याने कर्नाटकातून ऊस वाहतूक कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.
