कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारी १४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये कोल्हापूर शहरातील एका तरूण डॉक्टरचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ तर जिल्ह्यातील संख्या ६७९ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात करोनाबाधित रुग्ण वाढीचे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसे कमी होते. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार १४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६७९ झाली आहे.

कोल्हापुरात सतर्कता

आज सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांमध्ये रंकाळा परिसरातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. याची दखल घेऊन तत्काळ रंकाळा मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. या तरुणाच्या कुटुंबियांचे करोना नमुने चाचणी घेण्याचे काम सुरू होते. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. खाजगी दवाखान्यात हे डॉक्टर दांपत्य काम करते. त्यांचा हा मुलगा असल्याचे सांगितले जाते.

४२५ रूग्ण बरे होऊन गेले घरी

आजअखेर ६६५ रूग्णांपैकी ४२५ जणांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. आज सकाळी ७२ अहवाल नकारात्मक आले. आजअखेर जिल्ह्यात एकूण २३२ करोना सकारात्मक रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.