कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यत अतिवृष्टी आणि महापूर यामुळे शुक्रवारी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अपघात, वाहतुकीचे मार्ग  बंद, वीज – दूरध्वनी बिघाड आदी प्रश्नांचा मुकाबला करावा लागत आहे.

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. किणी टोल नाका तसेच बेळगाव जिल्ह्यतील यमगर्णी व निपाणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत अडथळे आले आहेत. पुणेबंगळुरु महामार्गालगत सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा व बंगळुरु-पुणेकडून शिरोलीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावर ४ फूट पाणी असल्याने बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी बेरीकॅटिंग करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बस चालक अटक

अजित जयवंतसिंह रजपूत (रा. नाशिक) हा सावता माळी कंपनीची मोठी प्रवासी बस घेऊन आज गारगोटीकडे जात होता. पोलीस पाटील संदीप आनंदा गुरव व इतर कार्यकर्त्यांनी चिकोत्रा नदीच्या पुलावर मोठय़ा प्रमाणात पाणी आहे, असे सांगत होते. बसमधील इतर प्रवाशीही त्यास ‘जीवितास धोका आहे; बस पुढे नेऊ नका’ असे सांगत असतानाही त्याने न ऐकता बस हलगर्जीपणाने प्रवाहात घालून स्वत:चे, प्रवाशांचे जीवितास धोका निर्माण केला, अशी फिर्याद संदीप गुरव (पांगिरे) यांनी दिल्याने परदेशी याला अटक केली आहे.

ग्राहकांना फटका 

जिल्ह्यत अनेक ठिकाणी वीजपुरवठय़ाचा बोजवारा उडाला. कोल्हापूर शहर विभागातील ३  उपकेंद्रे, १९ वीजवाहिन्या, ५०३ वितरण रोहित्रे बंद असल्याने ५० हजार ३२३ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. दोन्ही ग्रामीण  विभागातील ७२ हजार ग्राहकांच्या वीजपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. याच्या नियंत्रणासाठी पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे कोल्हापुरात दाखल झाले असून तातडीची बैठक घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजनाबाबत आढावा घेतला.