कोल्हापूर : इचलकरंजीसाठी सुळकूड नळपाणी योजना राबविण्याबाबत बुधवारी झालेल्या मेळाव्यात दोन मतप्रवाह दिसून आले. संघर्षाची भूमिका न घेता समन्वय व चर्चेतून ही योजना कार्यान्वित करण्याबाबत आजी, माजी खासदार- आमदार यांनी आश्वस्त केले. तर या पाणी योजना संदर्भात शासनाने भूमिका जाहीर केली नाही तर जनभावनेचा रेटा दाखविण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी मोर्चा निघणारच अशी भूमिका समन्वयक प्रताप होगाडे यांनी जाहीर केली.
हेही वाचा >>> शरद पवार यांची शुक्रवारी सभा; कोल्हापुरात राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
खासदार धैर्यशील माने म्हणाले, आपल्या भागातील लोकांना खूष करण्यासाठी लोकप्रतिनिधी वेगळी भूमिका मांडत असतील तर आम्हीसुध्दा इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेमुळे कोणाचेही नुकसान होणार नाही हे समजून सांगण्यासाठ त्या भागात जावून समजावून सांगू. आमदार प्रकाश आवाडे यांनी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यत्र्यांनी ही योजना स्थगित अथवा रद्द केलेली नाही असे मत सर्वांसमोर मांडण्यास सांगितले आहे. एखादा मंत्री म्हणजे शासन नव्हे. वारणा योजना अनुभव लक्षात घेता टोकाची भूमिका घेण्यात येऊ नये. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर शहरासाठी नळपाणी योजनेचे काम पूर्णत्वासाठी सर्वांची धडपड सुरु असताना इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्याचे कोडे न सुटणारे आहे. शेतकर्यांनी शेतीला पाणी कमी पडेल ही भीती बाळगू नये. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वतीने अजित जाधव यांनी पाणी प्रश्नी जे करावे लागेल त्यामध्ये अग्रभागी राहू अशी ग्वाही दिली.